Mahavitaran : थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यास पुनर्जोडणीसाठी शुल्क भरणे आवश्यक

एमपीसी न्यूज – थकीत वीजबिलांचा (Mahavitaran) भरणा न केल्यामुळे महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर थकबाकीची रक्कम व नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरात पश्चिम महाराष्ट्रामध्ये तब्बल 44 हजार 972 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

दैनंदिन आयुष्यात वीज ही अत्यंत आवश्यक झालेली आहे. मात्र वीज वापरल्यानंतर बिलांचा नियमित भरणा होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 14 लाख 16 हजार 300 ग्राहकांकडे 254 कोटी 20 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा- 165 कोटी 14 लाख रुपये (7,30,850), सातारा- 15 कोटी 34 लाख (1,42,900), सोलापूर- 31 कोटी 94 लाख (1,96,915), कोल्हापूर- 23 कोटी 92 लाख (1,82,520) आणि सांगली जिल्ह्यात 17 कोटी 85 लाख रुपयांची (1,63,050) थकबाकी आहे.

थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर वीजपुरवठा पुन्हा जोडून घेण्यासाठी थकबाकीच्या रकमेसोबतच नियमानुसार ग्राहकांनी पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी भरणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुनर्जोडणी शुल्क निश्चित केले आहे. यामध्ये लघुदाब वर्गवारीतील सिंगल फेजसाठी 210 रूपये व थ्री फेजसाठी 420 रुपये तसेच उपरी व भूमिगत वीजवाहिन्यांद्वारे दिलेल्या वीजजोडण्यांच्या पुनर्जोडणीसाठी सिंगल फेजसाठी प्रत्येकी 310 रुपये व थ्री फेजसाठी प्रत्येकी 520 रुपये शुल्क आहे. तर उच्चदाब वर्गवारीसाठी 3150 रुपये शुल्क लागू आहे. या शुल्कांवर 18 टक्के जीएसटी कर लागू आहेत. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत रक्कम आणि नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक (Mahavitaran) जीएसटीचा भरणा केल्यानंतरच वीजपुरवठा पूर्ववत करावा असे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत.

Ghazipur Bus Fire : गाझीपूरमध्ये बसला भीषण आग; वरातीच्या बसवर पडली हाईटेंशन वायर, पाच जणांचा होरपळून मृत्यू

दरम्यान थकबाकीमुळे गेल्या महिन्याभरात पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 43 हजार 615 आणि इतर अकृषक 1357 अशा एकूण 44 हजार 972 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्हा- 29 हजार 440, सातारा- 3258, सोलापूर- 6154, कोल्हापूर- ३,०६२ आणि सांगली जिल्ह्यातील 3058 थकबाकीदारांचा समावेश आहे.

आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरु आहे. ही कटू कारवाई तसेच नियमानुसार पुनर्जोडणी शुल्काचा भरणा, वीज नसल्याने गैरसोय होणे आदी टाळण्यासाठी थकीत वीजबिलाची रक्कम ताबडतोब भरावी. यासाठी वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही ऑनलाइनद्वारे थकीत व चालू वीजबिल भरण्याची सोय www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध आहे. सोबतच 5 हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.