Pimpri News: भ्रष्टाचार, लाचखोरीच्या स्पर्धेतही भाजपचे नेते अव्वलस्थानी येतील – योगेश बहल

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेमध्ये गेल्या पाच वर्षांत सत्तेच्या जोरावर लाचखोरी आणि भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपकडून महापौर परिषदेच्या पुरस्कारावरून उर बडवून घेण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड शहराचा सन्मान ज्यांनी धुळीस मिळविला ते आता विकासकामांच्या गप्पा मारत आहेत ही मोठी शोकांतिका असून भ्रष्टाचार, लाचखोरी आणि खंडणीखोरांची एखादी स्पर्धा घेतल्यास भाजपचा नक्कीचा पहिला नंबर येईल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे माजी महापौर तथा मुख्य प्रवक्ते योगेश बहल यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेस उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र महापौर परिषदेतर्फे ‘ब’ वर्ग महापालिकांच्या गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाल्यानंतर भाजपाचे माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रक काढून भाजपने केलेल्या कामगिरीचे कौतुक करतानाच राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्याला आता  बहल यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर देत भाजपवर सडकून टीका केली आहे.

याबाबत बहल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र महापौर परिषदेच्यावतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘ब’ वर्गात उत्कृष्ट काम केल्याबद्दलचा पुरस्कार दिला आहे. ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक या तीन महापालिका ‘ब’ वर्गात येतात. त्यामध्ये पहिला पुरस्कार मिळविल्याचा दावा एकनाथ पवार करीत आहेत. सन 2018-19 या वर्षांतील कामांसाठी हा पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. वास्तविक, या वर्षांत केलेल्या ज्या योजनांबद्दल हा पुरस्कार मिळाला त्या योजना राष्ट्रवादीच्या काळात सुरू झालेल्या आहेत.

मल:निस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, महिला व बालकल्याण योजना, स्वच्छता, आरोग्य, वैद्यकीय सुविधांबाबत हा पुरस्कार देण्यात आला आहे. यातील कोणती योजना एकनाथ पवारांच्या पक्षाने आपल्या सत्ताकाळात सुरू केली ते एकदा जाहीर करावे, असे आव्हानही बहल यांनी दिले आहे. इतरांच्या कामांचे श्रेय लाटण्याची परंपरा कायम राखणाऱ्या भाजपने आपल्या सत्ताकाळात कोणत्या योजना आणल्या त्या जनतेसमोर मांडाव्यात असेही बहल यांनी म्हटले आहे.

कोरोना काळात या भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी गोरगरीब कोरोना बाधितांची रेमडेसीवीरसारखी इंजेक्शन विकून स्वत:ची घरे भरल्याचे प्रकार आणि रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी पैसे घेणाऱ्या ‘स्पर्श’ हॉस्पीटलमधील भाजप नगरसेवकांची भागीदारी उजेडात त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी आणून यापूर्वीच ‘घरचा पुरस्कार’ दिला आहे. संतपिठासारखा जिव्हाळ्याच्या विषयात देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करावा यासारखे शहरवासीयांचे दुसरे दुर्दैव नाही. शहरवासीयांसाठी अत्यंत लाजिरवाणे आणि वेदना देणारे उद्योग भाजपने गेल्या पाच वर्षांत आपल्या सत्तेच्या जोरावर केलेले असताना आता पुरस्काराचे श्रेय लाटण्याचा प्रकार हा हास्यास्पद आहे. अशा पुरस्कारामुळे भाजपनेत्यांनी पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणे आता सोडून द्यावे, असा टोलाही बहल यांनी लगावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.