Talegaon Dabhade News : नगरपरिषदेत मुख्याधिकारी नसल्याने लोकप्रतिनिधी, नागरिकांची गैरसोय

एमपीसी न्यूज – तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना लाच घेताना एसीबीने पकडले. त्यावरून त्यांना प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले. त्यामुळे तळेगाव नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काम पाहत आहेत. स्वतंत्र मुख्याधिकारी नाहीत, विविध विभागाचे अधिकारी सुट्टीवर जातात यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र मुख्याधिकारी नेमण्याची मागणी तळेगावकर करीत आहेत.

येथील नगरपरिषदेमध्ये प्रशासकीय यंत्रणेतील प्रमुख अधिकारी नसल्याने कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. नागरिकांना मात्र नगरपरिषदेमध्ये कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. अधिकारी नसल्याने लोकप्रतिनिधी देखील हतबल झाले आहेत.

नगरपरिषदेचा प्रशासकीय कारभार ज्यांच्याकडे असतो त्या मुख्याधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तेव्हापासून या पदाचा पदभार लोणावळ्याचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्याकडे सोपवला आहे. ते आपल्या सवडीनुसार

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे कामकाज पाहत असल्याची टीका केली जात आहे. नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजा मध्ये असणारे लेखापाल, पाणीपुरवठा विभागप्रमुख व काही विभागांचे प्रमुख सुट्टीवर असल्याने त्यांचा पदभार प्रभारी म्हणून अन्य अधिकारी पाहत आहेत. यामुळे नगर परिषदेमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने प्रशासनाचे कामकाज सुस्त झाले आहे.

या वर्षाच्या अखेरीस किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला ज्या नगरपरिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या मुदती संपत आहेत. त्यांच्या निवडणुका शासनाने वेळेमध्ये होतील असे प्रसिद्ध केले आहे. त्यास अनुसरून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

विकासकामांना बसली खीळ

शासनाच्या आदेशान्वये मतदारयाद्या तयार करणे, एक सदस्य वॉर्ड तयार करणे व अन्य निवडणुकीचे कामकाज जबाबदारीने पार पाडणे आवश्यक आहे. परंतु, या ठिकाणी पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने नगरसेवकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. नगरपरिषदेमध्ये मालमत्ता करवसुलीची गती वाढवणे, विकास- कामांची पाहणी करून पुढील कामांचे मार्गदर्शन करणे, येणाऱ्या निवडणुकीची वॉर्ड रचना, एका वॉर्डातील मतदारसंख्या, आरक्षणाची सोडत आदी बार्बीविषयी खात्रीशीर माहिती व्हावी. तसेच, याबाबत कोणती यंत्रणा कार्यरत आहे, याबद्दल सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.