Bhosari : राज्यात बचत गटांची ताकद वाढतेय – पंकजा मुंढे

भोसरीमधील 'इंद्रायणी थडी' महोत्सवाचे मुंढे यांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज – कधीकाळी एका जिल्ह्यात सुरु झालेले बचत गटांचे जाळे आज राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये पसरले आहे. बचत गटांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. राज्य शासन महिला बचत गटांना मदत करून त्यांना बळ देत आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी व्यक्त केले.

  • भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अंतर्मुख करायला लावणारा ‘इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव भरविण्यात आला आहे. या महोत्सवाचे उदघाटन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

उदघाटन समारंभासाठी आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, तळेगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपच्या प्रवक्त्या उमा खापरे, माजी महापौर नितीन काळजे, पूजा लांडगे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, स्वीनल म्हेत्रे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, सागर गवळी आदी उपस्थित होते.

  • यावेळी पंकजा मुंढे म्हणाल्या, “महिलांकडे बचतीचे सर्वात मोठे तंत्र आहे. स्वतःसाठी खर्च न करता हे तंत्र त्या सुखी संसारासाठीच वापरतात. संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणे हा त्यामागील हेतू असतो. महिलांच्या या बचतीच्या ताकदीला ओळखून त्यांना बचतीच्या माध्यमातून वेगवेगळी प्रगतीची दालने उघडून दिली पाहिजेत. इंद्रायणी थडी च्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांना ही संधी मिळाली आहे. महिला बचत गटाची सुरुवातील उलाढाल केवळ 50 लाखांच्या आसपास होती. शासनाने बचत गटांना प्रोत्साहन दिले. त्यातून महिला बचत गटांनी कोट्यवधींचे आकडे पार करत 10 कोटींपेक्षा जास्त उलाढाल केली. शासन महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देत आहे.

मुलीला दुर्गा, सरस्वती अशा वेगवेगळ्या रूपांनी ओळखले जाते. तिची पूजा केली जाते. मात्र, हीच दुर्गा सरस्वती आपल्या घरात जन्माला आली तर तिचे पडलेल्या चेह-यांनी स्वागत केले जाते. मुलींना दुय्यम दर्जाची वागणूक न देता त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवला पाहिजे. मुली कुठेही कमी पडत नाहीत. आपण फक्त त्यांना संधी द्यायला हवी, असेही मुंढे म्हणाल्या.

  • महेश लांडगे आमच्याच बरोबर राहतील
    आमदार महेश लांडगे मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप सोबत नव्हते. ते निवडून आल्यानंतर ते भाजपचे सहयोगी सदस्य झाले. ते राबवत असलेले विविध उपक्रम आणि करत असलेली समाजोपयोगी कामे उल्लेखनीय असल्याने मी त्यांना साथ देणार आहे. ते आमचे मित्र आहेत. आमदार महेश लांडगे यापुढे आमच्यासोबतच राहतील, यासाठी आम्ही त्यांना ताकद देणार आहोत, असे पंकजा मुंढे म्हणाल्या.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 70 वर्षात साधी शौचालये बांधता आली नाहीत
विरोधकांवर निशाणा साधताना मुंढे म्हणाल्या, “सत्तर वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 70 वर्षात साधी शौचालये बांधता आली नाहीत. भाजप सरकार आल्यानंतर संपूर्ण राज्याला हागणदारी मुक्त केलं. विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्याला मिळावा यासाठी उपाय केला. मधल्या दलालांना बाजूला काढलं. नवीन योजना राबविल्या. बेघरांना घरं देण्याचं काम केलं. भाजप सरकार जनतेची सेवा करण्यासाठी आहे. जनता येत्या निवडणुकांमध्ये योग्य कौल देतील.”

  • कर्तृत्ववान महिलांचा पुरस्काराने गौरव :
    उदघाटन समारंभात परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा ‘इंद्रायणी कर्तृत्ववान महिला’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार :
सत्यभामा देशमाने, ज्योती पठानिया, सुमन सहाणे, पुष्पा ढगे, ब्रह्मकुमारी बहनजी.

झाशीची राणी लक्ष्मीबाई शौर्य पुरस्कार :
नीलिमा जाधव, ओवी सातपुते, विद्या पाटील, गिरीजा लांडगे, सुमन पवळे, शुभांगी शिंदे, राष्ट्रसेविका समिती.

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक पुरस्कार :
सुरेखा सुकाळे, यशोदा पवार, डॉ. सुजाता गायकवाड, स्मिता काळे, नेत्रा तेंडुलकर, अंकिता तेंडुलकर, रत्ना पाटील

अहिल्यादेवी होळकर समाजभूषण पुरस्कार :
भारतीय स्त्री शक्ती जागरण, सारिका पवार-बडगुजर, सुखदेवी नाटेकर, ज्योत्स्ना मावळे कासार, पूनम गोसावी, राजेश्री घागरे

रमाबाई आंबेडकर त्यागमूर्ती पुरस्कार :
मंदाकिनी ठाकरे, सविता साळुंखे, अक्षता पाताडे, डॉ. तृप्ती परदेशी, अॅड. कविता स्वामी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.