Pimpri : क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती तर्फे रविवारी भूमिवंदन, पारधी बांधवांना गाईचे वाटप

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार

एमपीसी न्यूज -क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने येत्या रविवारी (दि.10) भूमिवंदन, कुर्डुवाडी परिसरातील दहा पारधी बांधवांना गाईचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच पुणे सायन्स फोरम आई गुरुकुलम यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘डिजिटल सायन्स लॅब’चे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी, नदी विकास व गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

याबाबतची माहिती क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली. पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेला समितीचे कार्यवाह अॅड. सतीश गोरडे, सहकार्यवाह रवींद्र नामदे उपस्थित होते.

  • चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी दुपारी तीन वाजता होणा-या कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर राहुल जाधव, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, शिपींग कॉर्पोरेशन बोर्डाचे अध्यक्ष प्रदिप रावत, राज्य मदत व पुर्नवसन, पुर्नस्थापन महामंडळाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, लोख लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत.

याबाबत गिरीश प्रभुणे म्हणाले, “क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, करमाळा, तुळजापूर, उस्मानाबाद परिसरातील पारधी बांधवांच्या सर्वांगीण विकास प्रकल्पाअंतर्गत (बीआरएलएफ) देशी गायींच्या दूध प्रक्रिया उद्योगात सहभागी असणाऱ्या 200 पारधी कुटूंबियांपैकी दहा कुटूंबियांना दहा गाईचे वाटप करण्यात येणार आहे. पुढील वर्षभरात 200 कुटूंबियांना 400 गाई देण्यात येणार आहेत. तसेच सायन्स फोरम व गुरुकुलम यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘डिजिटल सायन्स लॅब’चे मंत्री गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पुण्यातील सर्व संशोधन संस्थामधील वरिष्ठ शास्त्रज्ञ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. या उपक्रमाचे संयोजक डॉ. योगेश शौचे आहेत.

  • चापेकर वाड्यातील क्रातीकारकांच्या पुतळ्याला नितीन गडकरी पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यानंतर भूमिवंदन केले जाणार आहे. गडकरी समितीतर्फे चालविण्यात येणा-या पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला भेट देणार आहेत. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित दिल्या जाणा-या प्रशिक्षण विभागाची माहिती घेणार आहेत” विद्यार्थ्यांचे लाकडी कोरीव काम, धातू काम, तेलोय मशिनवरील काम, अगरबत्ती बनविण्याच्या कामाची देखील ते पाहणी करणार असल्याचे प्रभुणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.