Pimpri: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल महापौरांचे आक्षेपार्ह विधान?; महापौरांनी आरोप फेटाळला

एमपीसी न्यूज – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. सावित्रीबाई फुले इंग्रजांकडे धुणी-भांडी करत होत्या. तेथूनच त्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केल्याचे वादग्रस्त विधान केल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी केला आहे. दरम्यान, मी असे बोलले नाही. महिलांना ताठ मानेने जगण्याची प्रेरणा देणाऱ्या सावित्रीबाई यांच्याविषयी मी स्वप्नातही चुकीचे बोलू शकणार नाही. माझ्या बदनामीसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा वापर करणे निंदनीय, असे महापौर ढोरे म्हणाल्या आहेत.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन यांच्या वतीने सांगवीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महापौर उषा ढोरे उपस्थित होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इंग्रजांकडे धुणी-भाडी करत होत्या. तेथूनच त्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केल्याचे विधान केल्याचा दावा भारिपचे तायडे यांनी केला आहे. महापौरांनी केलेले विधान निंदनीय आहे. यामुळे स्त्रियांचे प्रेरणास्थान असलेल्या सावित्राबीई फुले यांचा अवमान झाला आहे. महापौरांचा आम्ही धिक्कार करतो. त्यांनी तत्काळ राजीनामा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत आयोजकांची चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली असल्याचे तायडे यांनी सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी स्वतःच आयुष्य पणाला लावल. अशा थोर पदाच्या जनक, कवियत्री व लेखिका सावित्रीबाई फुले यांच्यावरतीच शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनी वादग्रस्त विधान करणे अत्यंत चुकीचे आहे. महापौर स्वतः महिला असून त्यांनी सावित्रीबाई फुले इंग्रजांकडे धुणीभांडी करत होत्या, असं बेताल वक्तव्य करून महिला वर्गाला कलंक निर्माण केला आहे. महासभेत देखील महापौरांनी राष्ट्रगीताचा अवमान केला होता. राज्यात अनेक भाजपचे वाचाळवीर आहेत. त्यांच्या पंगतीमध्ये आता पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर बसल्या का? असा सवालही काटे यांनी उपस्थित केला आहे.

  • माझ्या राजकीय बदनामीचे षड्‌यंत्र – महापौर ढोरे
    या देशातील कोणतीही महिला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी चुकून सुद्धा चुकीचे वक्तव्य करू शकत नाही. कारण देशातील प्रत्येक महिलेला आज आपण कोणामुळे ताठ मानेने जगत आहोत, याची जाणीव आहे. आज देशातील महिला प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी करत आहेत. पुरूषांच्या बरोबरीने आज महिलांना स्थान मिळाले आहे. हे सर्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली झाल्यामुळेच शक्य झाले आहे. सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच मी शिक्षण घेऊ शकले आणि त्यांनी दिलेल्या अधिकारामुळेच आज महापौरपदापर्यंत पोहोचू शकले याचे मला पूर्ण भान आहे. परंतु माझ्या राजकीय बदनामीसाठी मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्याचे पसरवले जात असल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.