IND Vs SA 2nd Test Day 2 : कसोटी सामना समसमान अवस्थेत; दुसऱ्या डावात भारतीय संघाची चांगली लढत

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – भारतीय संघाच्या तुलनेत कमजोर वाटणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने आज दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जोरदार प्रतिकार करत पहिल्यांदाच या मालिकेत नाममात्र का होईना पण 27 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेत भारतीय संघावर मानसिक विजय मिळवला आहे. आजचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 2 गडी गमावून 85 धावा केल्या आहेत, ज्यामुळे भारतीय संघाकडे 58 धावांची आघाडी आहे.

कालच्या एक बाद 35 धावावरून पुढे खेळताना यजमान आफ्रिका संघाने आज चांगली सुरुवात केली. कर्णधार डीन एलगर आणि पीटरसनने दुसऱ्या गड्यासाठी 74 धावांची भागिदारी करताना भारतीय गोलंदाजांचा घाम काढला. अखेर ही जोडी पुन्हा एकदा शार्दूल ठाकूरने तोडत,त्याला मिडास स्पर्श असलेला का म्हणतात हे सप्रमाण सिद्ध केले. यानंतर त्याने केवळ 28 चेंडूत 8 धावा देत तीन गडी बाद करुन भारतीय संघाला चांगलाच दिलासा दिला आणि सामन्यात परत आणले.

एक बाद 88 वरून चार बाद 102 अशी आफ्रिका संघाची अवस्था झाल्याने कर्णधार राहुल जरासा निवांत झाला. याचाच फायदा उठवत पिटरसनने चांगली खेळी करत पुन्हा एकदा डाव सावरला. वैयक्तिक 62 धावा काढून तो बाद झाला, त्याचे हे पहिलेच अर्धशतक आहे. यानंतर बाऊमा आणि वीरलीनने बऱ्यापैकी संयम दाखवत खेळ सुरू ठेवला. वीरलीनने केवळ 21च धावा केल्या असल्या तरी त्याने बाऊमाला चांगलीच साथ दिली.

बाऊमा आपले 17 वे कसोटी अर्धशतक पूर्ण करून ठाकूरचीच पाचवी शिकार ठरला,ठाकूरने प्रथमच हा टप्पा पार करताना दक्षिण आफ्रिकेत सर्वात जास्त एका डावात बळी घेणारा गोलंदाज म्हणून आपले नाव इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले.

त्याने 61 धावा देत सात गडी बाद करत हरभजच्या सहा विकेट्सच्या जोहान्सबर्ग मधील विक्रमाला मोडून आपले नाव आज खऱ्या अर्थाने दखलपात्र केले आहे,मात्र दक्षिण आफ्रिका संघाच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट फलंदाजी करत आपल्या संघाला नाममात्र का होईना पण पहिल्या डावात 27 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेत भारतीय संघाला मानसिक रित्या पराभूत केले आहे.

ठाकुरला शमीने दोन तर बुमराने एक बळी घेत साथ दिली. दुसऱ्या डावात 27 धावांची पिछाडी घेऊन खेळणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार राहुल आठ तर मयंक 23 धावा काढुन बाद झाल्यानंतर भारतीय संघ आणखीनच दडपणाखाली आला खरा,पण याचवेळी पुजारा आणि रहाणे या अनुभवी फलंदाजानी उत्तम खेळत अधिक पडझड न होवू देता आजचा दिवस खेळून काढला. आता भारतीय संघाकडे 58 धावांची आघाडी असून उद्या यात किमान दोनशे धावा ऍड करण्यासाठी भारतीय फलंदाज उत्सुक असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.