Sindhutai Sapkal passes away : अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन

एमपीसी न्यूज – अनाथांची माय ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन झाले आहे. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज (दि.4) संध्याकाळी सव्वा आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईनां लोक प्रेमाने ‘माई’ म्हणत. सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सिंधुताई सपकाळ यांचे काही दिवसांपूर्वी हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती, अखेर आज वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. त्यांचे जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण झाले. अनाथ मुलांसाठी सिंधुताई यांनी 1994 साली ‘ममता बाल सदन’ संस्थेची स्थापना केली. पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.

याबाबत अधिकची माहिती अशी की, सिंधुताई सपकाळ यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

अतिशय खडतर परिस्थितीत आयुष्य व्यतीत करुन शेकडो अनाथ मुलांना आईच्या मायेचं छत्र देणाऱ्या सिंधूताईंनी आपल्या कार्याचा ठसा अगदी जनमानसात उमटलवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.