Chess Olympiad: बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सहविजेतेपद

अंतिम लढतीत भारताचा मुकाबला बलाढय़ रशियाशी होता. पहिला सामना 3-3 असा बरोबरीत सुटल्यामुळे दुसऱ्या सामन्याला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले होते.

एमपीसी न्यूज – बुद्धिबळ विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने रविवारी रशियाच्या बरोबरीने ऐतिहासिक सहविजेतेपद पटकावले. माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद, जलद प्रकारातील विद्यमान जगज्जेती कोनेरु हम्पी अशा प्रतिभावंतांच्या अनुभवासह, दिव्या देशमुख, प्रज्ञानंद, निहाल सरीन अशा युवा बुद्धिबळपटूंच्या असीम ऊर्जेला विदिथ गुजरातीच्या नेतृत्वाची साथ मिळाली.

अंतिम लढतीत भारताचा मुकाबला बलाढय़ रशियाशी होता. पहिला सामना 3-3 असा बरोबरीत सुटल्यामुळे दुसऱ्या सामन्याला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले होते. या सामन्यात कोनेरु हम्पीचा पराभव झाला, परंतु दिव्या देशमुख जेतेपदाच्या मार्गावर होती. मात्र दिव्या देशमुख तसेच निहाल सरीनची इंटरनेट जोडणी अचानक खंडित झाली आणि वेळेवर चाली पूर्ण करता न आल्याने त्यांचा पराभव झाल्याचे जाहीर झाले.

दुसऱ्या सामन्यात अशा प्रकारे भारत 1.5-4.5 पराभूत झाला होता. पण भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेकडे याविषयी अपील केले. ते ग्राह्य़ धरले गेले आणि फिडेचे अध्यक्ष अर्कादी द्वोर्कोविच यांनी भारत व रशियाला सहविजेते घोषित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, रशियाच्या टीमचे देखील त्यांनी अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.