Chinchwad News: दारू पिताना वाद, डोक्यात वॉशबेसिन मारून मित्राचा केला खून; आरोपी पोलीस चौकीत झाले हजर

किरकोळ वादातून चिढलेल्या आरोपींनी बाजूला पडलेले वॉश बेसिन शुभमच्या डोक्‍यात मारले. शुभम रक्‍ताच्या थारोळ्यात पडला.

एमपीसी न्यूज – दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून तीन मित्रांनी मिळून चौथ्या मित्राच्या डोक्यात वॉशबेसिन मारून त्याचा खून केला. खून केल्यानंतर तिन्ही मित्र जवळच्या पोलीस चौकीत हजर झाले. आरोपी मित्रांनी आपण खून केल्याचे पोलिसांना सांगितले. ही घटना रविवारी (दि.30) रात्री चिंचवड येथे घडली.

शुभम रणजित साठे (वय 21, एकता हौसिंग सोसायटी, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा कापुरे (वय 19), अजय क्षीरसागर (वय 20) आणि ज्ञानेश्‍वर थोरात (वय 20, तिघेही रा. समता कॉलनी, थेरगाव) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्‍वजीत खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही आरोपी एकमेकांचे मित्र असून ते ऑनलाइन खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपनीत कामाला आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचे काम बंद होते. त्यामुळे ते सध्या घरीच होते.

रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास चिंचवड काळेवाडी रस्त्यावरील चितराव गणपती मंदिराजवळ असलेल्या खुशबू हॉटेलच्या मागे ते चौघेजण दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला.

किरकोळ वादातून चिढलेल्या आरोपींनी बाजूला पडलेले वॉश बेसिन शुभमच्या डोक्‍यात मारले. शुभम रक्‍ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेवाडी पोलीस चौकीत स्वतःहून हजर झाले.

आरोपींनी घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर काळेवाडी चौकीतील पोलिसांनी त्यांना चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.