Chinchwad News: एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलचे कामकाज कायद्याला धरूनच; मॉल व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण

कायद्यानुसार कामगारांना 45 मिनिटांची जेवणाची सुट्टी देण्यात येते. त्याचबरोबर दिवसातून दोन वेळेला चहाची सुट्टी (टी ब्रेक) देखील देण्यात येते.

एमपीसी न्यूज – चिंचवड गावातील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल व्यवस्थापनाच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसून मॉल व्यवस्थापन तिथे काम करणा-या प्रत्येक कामगाराला सन्मानाची वागणूक देत आहे. तसेच मॉल प्रशासन शासनाच्या प्रत्येक नियमाचे पालन करत असल्याचे स्पष्टीकरण एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलकडून पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांच्याकडे सदर करण्यात आले आहे.

एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल व्यवस्थापन तिथे काम करणा-या कामगारांना योग्य वागणूक देत नसून कामगार व्यवस्थापनाच्या दबावाखाली काम करत आहेत. तसेच मॉल प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याचे आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केले होते. तसेच त्याबाबतचे पत्र त्यांनी 24 ऑगस्ट रोजी महापौरांना दिले होते. त्यावर एल्प्रो सिटी स्क्वेअर व्यवस्थापनाने महापौरांकडे आपले स्पष्टीकरण सादर केले आहे.

एल्प्रो सिटी स्क्वेअरकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, एल्प्रो सिटी स्क्वेअर येथे काम करणा-या सर्व कर्माचा-यांसाठी कायद्यानुसार मार्गदर्शक नियमावली बनविण्यात आली आहे. इथे काम करणारा प्रत्येक कर्मचारी मोकळ्या वातावरणात काम करत आहे.

कायद्यानुसार कामगारांना 45 मिनिटांची जेवणाची सुट्टी देण्यात येते. त्याचबरोबर दिवसातून दोन वेळेला चहाची सुट्टी (टी ब्रेक) देखील देण्यात येते. एल्प्रो सिटी स्क्वेअर येथे काम करणा-या कर्मचा-यांसाठी शासनाच्या आदेशानुसार सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत कामाच्या शिफ्ट बनविण्यात आल्या आहेत.

त्यानुसार काम केले जात आहे. सायंकाळी सात नंतर कुणालाही एल्प्रो सिटी स्क्वेअरमध्ये प्रवेश दिला जात नाही. तसेच शिफ्टच्या वेळेनुसार कर्मचा-यांना एल्प्रो सिटी स्क्वेअर परिसर सोडण्याची परवानगी आहे.

शासनाने दिलेल्या सूचनांनुसार एल्प्रो सिटी स्क्वेअरमध्ये येणा-या प्रत्येकाचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. कोरोना साथीचा प्रसार थांबवण्यासाठी एल्प्रो सिटी स्क्वेअर व्यवस्थापन सर्व स्तरावर प्रयत्नशील आहे.

एल्प्रो सिटी स्क्वेअरमध्ये काम करणारे सुरक्षा कर्मचारी पीपीई कीट वापरत आहेत. सेन्सर आधारित स्वयंचलित हात निर्जतुकीकरण एल्प्रो सिटी स्क्वेअर मध्ये उपलब्ध आहे. तापमान यंत्राद्वारे सर्व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या शरीराचे तापमान मोजले जाते. आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये नोंदविलेल्या स्थितीवर एल्प्रो सिटी स्क्वेअरकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

सर्व प्रवेशद्वारावर बॅगेसाठी यूव्ही सॅनिटायझेशन बॉक्सची तरतूद करण्यात आली आहे. त्यामधून मोबाईल आणि अन्य डिव्हाइस सॅनिटायझ केले जातात, मॉलमधील सर्व संभावित स्पर्श होणा-या ठिकाणी योग्य काळजी घेण्यात आली आहे. शूज सॅनिटायझिंग मॅट्स देखील टाकण्यात आल्या आहेत. त्यातूनही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर त्यासाठी आपत्कालीन अलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांना कुणीतरी जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली असून त्याआधारे त्याना तक्रार करण्यास भाग पाडण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसून त्यांना त्यांची तक्रार मागे घेण्याच्या सूचना द्याव्या, असेही एल्प्रो सिटी स्क्वेअरकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.