Maharashtra Day : महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज (सोमवार, दि. 29) घेण्यात आली. यावेळी अप्पर सचिव मिलिंद हरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ.आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

 

आज झालेल्या रंगीत तालीममध्ये राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस ध्वज, मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, मुंबई अग्निशमन दल ध्वज, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई पोलीस आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ब्रास बॅण्ड पथक, राज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई पोलीस विभागाचे निर्भया वाहन पथक, मुंबई अग्निशमन दलाचे हाय राईज फायर फायटिंग वाहन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर(Maharashtra Day) आदी पथकांनी सहभाग घेतला.

 

उत्कृष्ट संचलन पुरस्कार

 

भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये शासकीय सेवेतील सहभागी पथकांच्या गटात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या सी-60 पथकाने प्रथम, राज्य राखीव पोलीस बलाने द्वितीय तर बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकाने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला.

 

शालेय सहभागी पथकांमध्ये रोड सेफ्टी पेट्रोल (मुले), डॉ.अँटोनियो डा सिल्वा हायस्कूल, दादरच्या पथकाने प्रथम तर रोड सेफ्टी पेट्रोल (मुली), एमसीएम मुलींचे हायस्कूल, काळाचौकी च्या पथकाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम गटात नायगाव/ परेल भोईवाडा म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने प्रथम, ग्लोब मिल पॅसेज म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने द्वितीय तर सांताक्रूझ (पूर्व) मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार(Maharashtra Day) मिळविला.

 

या समारंभात किरण सुरेश शिंदे,अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. शिबानी जोशी आणि पल्लवी मुजुमदार यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.