Chinchwad News : आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय ओळख दिनानिमित्त महापालिकेकडून बुधवारी संवादात्मक कार्यक्रम

एमपीसी न्यूज – तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध उपक्रम आणि योजना राबवण्याचे काम हाती घेतले आहे. या समूहाला संवादात्मक विचारपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेने येत्या बुधवारी (दि.30) आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय ओळख दिनानिमित्त एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना हक्क, न्याय आणि प्रतिष्ठा मिळवून देणे तसेच त्यांच्या नागरी हक्कांबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये बुधवार दुपारी चार वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तृतीयपंथीयांसाठी शहरात स्वतंत्र शौचालये महापालिकेच्या वतीने उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच त्यांचे विविध प्रश्न जाणून घेऊन त्या अनुषंगाने सुविधा निर्माण करणे आणि योजना राबवण्यासाठी देखील महापालिका प्रयत्नशील आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने विविध उपक्रम देखील राबवले आहेत. कोरोना काळात या समूहाच्या लसीकरणासाठी स्वतंत्रपणे सोय करण्यात आली होती. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबिर, तपासणी शिबिराचे आयोजन महापालिका करत असते. नागरवस्ती विकास योजना विभागांतर्गत नाविण्यपूर्ण पथदर्शी योजना तयार करून तृतीयपंथी समूहाला मुख्य प्रवाहात आणण्याचे महापालिकेने ठरवले असून त्यादृष्टीने पावले देखील उचलण्यात आली आहेत. तृतीयपंथीय समाजाच्या उन्नतीसाठी महापालिका स्तरावर विविध उपक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यात येत आहे. यावेळी महापालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय ओळख दिन साजरा करण्यात येत आहे. त्यादृष्टीने या घटकांचा संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तृतीयपंथीयांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा सन्मान या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे. तसेच तृतीयपंथी प्रमाणपत्र आणि ओळखपत्राचे यावेळी वितरण करण्यात येणार आहे. यानंतर ‘तृतीयपंथी समाज आणि मानसिक आरोग्य’ या विषयावर भारती हॉस्पिटलच्या डॉ. ज्योती शेट्टी यांचे मार्गदर्शन होणार आहे. तर मित्र क्लिनिकच्या डॉ. कांचन पवार ‘सर्वसमावेशक आरोग्य सुविधा’ या विषयावर बोलणार आहेत. विविध मान्यवरांचे मनोगतदेखील यावेळी व्यक्त होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.