Interview with PCMC’s first Mayor Dnyaneshwar Landage: पदाधिकारी चाचपडायला लागला की अधिकारी फायदा घेतात – ज्ञानेश्वर लांडगे

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – महापालिका कारभारावर महापौरांचा अंकुश असतो आणि तो असलाच पाहिजे.  पालिकेचे कामकाज कसे चालवायचे याची नियमावली आहे.  सभागृहाने घेतलेल्या निर्णयाला अनुसरुन प्रशासनाने काम केले पाहिजे. अधिकारी हा राबविणारा असतो. पदाधिकारी काम करुन घेणारा असतो. पदाधिका-याला अधिकार असतात. त्याच्या कुवतीनुसार तो काम करुन घेतो. पदाधिकारी चाचपडायला लागला की अधिकारी त्याचा फायदा घेतात, असे परखड मत पिंपरी-चिंचवडचे पहिले महापौर ज्ञानेश्वर लांडगे यांनी मांडले. तसेच लावलेल्या रोपाचे वटवृक्षात रूपांतर होतेय याचे आत्मिक समाधानही त्यांनी व्यक्त केले. 

11 ऑक्टोबर 1982 रोजी नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले. पिंपरी-चिंचवड पालिकेला उद्या रविवारी (दि.11) 38 वर्ष पूर्ण होत आहेत. 1986 मध्ये महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यानिमित्त शहराचे पहिले महापौर ज्ञानेश्वर लांडगे यांच्याशी ‘एमपीसी न्यूज’चे प्रतिनिधी गणेश यादव यांनी संवाद साधला.

प्रश्न – तेव्हाची पालिका आणि आत्ताची पालिका काय बदल झाला आहे?

उत्तर – सन 1982 साली पालिकेची घोषणा झाली.  ग्रामपंचायत, नगरपालिकेनंतर अल्पावधीतच पालिकेची स्थापना झाली. गाव, वस्ती, गावठाण होते. विखुरलेले नव्हते. लोकसंख्या कमी होती. सुरुवातीला रस्ते, पाणी नव्हते. आम्ही शून्यातून सुरुवात केली. सर्व स्ट्रक्चर उभे केले.

नवीन शहर उभारत आहे. चांगली कामे केली पाहिजे. लोकांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सोयी-सुविधा दिल्या पाहिजेत असे आमचे ध्येय होते. शहर विकास डोळ्यासमोर ठेऊन झपाटलेले कार्यकर्ते होते. त्यावेळचे अधिकारीही त्यादृष्टीनेच कामाकडे पाहत होते.

काळानुसार बदल होत आहे. जसजशा गरजा निर्माण होत आहेत. त्या पूर्ण करण्याचे पालिकेचे काम चालू आहे. विकास कामे झपाट्याने होत आहेत. परंतु, शहराच्या  लोकसंख्या वाढीचा वेगच जास्त आहे. कितीही केले. तरी, थोडासा अपुरे पणा जाणवल्या सारखा वाटतो.

होणा-या वाढीचा पाठपुरावा करायचा असेल आणि लोकांना सौख्य द्यायचे असेल. तर, प्रशासन, राज्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे वाहून घेवून काम केले पाहिजे. पण, तसे अजून दिसत नाही. काहीजण संधी तर काहीजण कर्तव्य म्हणून पाहतात. दोन्हीत मोठा फरक आहे.

प्रश्न – शहराच्या जडणघडणीबाबत काय सांगाल. कोणते मूलभूत फरक जाणवतात?

उत्तर – पूर्वीपेक्षा अनेक पटीने सोयी-सुविधा वाढलेल्या आहेत. लोकांना खरेदी विक्रीला बाहेर जावे लागत होते. आता शहरामध्ये सर्व उपलब्ध झाले आहे.

प्रश्न – पहिल्यावेळी किती नगरसेवक होते. तुमची निवड कशी झाली होती. तुमचे नाव कोणी सुचविले होते?

उत्तर – सन 1982 साली महापालिकेची घोषणा झाली.  1982 ते 1986 चार वर्षे हरनामसिंह प्रशासक होते. 1986 मध्ये पालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. पहिल्यावेळी 60 नगरसेवक होते. मी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलो होतो.

अगोदर पक्षामध्ये महापौरपदासाठी माझे नाव निश्चित झाले.  त्यावेळचे पुढारी, सहका-यांनी माझ्या नावावर उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केला होता. त्यानंतर निवडणूक झाली आणि मी निवडून आलो. मला 31 मते पडली होती. विरोधी उमेदवाराला 29 मते मिळाली होती.

अण्णासाहेब मगर यांच्यासोबत मी काम करत होतो. अण्णासाहेब नगरपालिकेचे अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत उपाध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. ते खासदारही होते.

सन 1967 पासून माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. 1967 साली मी भोसरीचा सरपंच होतो. शहराची उभारणी माझ्या साक्षीने झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 1990 पर्यंत मी सक्रिय होतो. 1990 ते 95 पर्यंत मी हवेली विधानसभेचा आमदार होतो.

प्रश्न – पहिले महापौर झाला होतात. काय भावना होत्या?

उत्तर – शहराचा विकास करणे हीच माझी भावना होती.  सरपंचपदापासून काम करत आलो होतो. आमचे संस्थापक अण्णासाहेब मगर हे सार्वजनिक कामाने झपाटलेले होते. वय झाले तरी लोकांच्या कामांकडे ते लक्ष देत असे. आम्ही त्यांच्यासोबत फिरत होतो.

त्यांची कामाची पद्धत आत्मसात केली. त्याच विचाराने प्रेरित होऊन पुढे येणा-या प्रत्येक जबाबदारीला जेवढा न्याय देता येईल, तेवढा दिला. त्याप्रमाणे प्रयत्न करत राहिलो. विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम केले.

प्रश्न – सर्व नवीन होते. सभा कामकाज कसे चालवत होतात. विरोधक होते का, आयुक्तांचा हस्तक्षेप असायचा का?

उत्तर – सरपंच असताना ग्रामपंचायत चालविली होती. नगरपालिकेचा आठ वर्ष मी उपाध्यक्ष होतो. अण्णासाहेब मगर अध्यक्ष होते. तिथे प्रत्येकवेळी ते येत नव्हते. त्यामुळे नगरपालिकेचेही कामकाज जवळून बघितले. सभागृह चालविण्याचे प्रशिक्षण झाले होते. त्यामुळे महापालिका चालविणे अवघड गेले नाही.

विरोधक जवळजवळ निम्याला निम्मे होते. ध्येय-धोरणे योग्य ठरवली. तर हस्तक्षेपचा प्रश्नच येत नाही. पदाधिका-यांनी जे ठरवले. ते राबविणे आयुक्तांवर बंधनकारक असते. प्रक्रिये प्रमाणे ते टाळू शकत नाहीत.

प्रश्न – महापालिका कारभारावर महापौरांचा अंकुश असतो का, नियंत्रण ठेवता येते की  नामधारी असतात?

उत्तर – महापौरांचा अंकुश असतो आणि तो पाहिजे देखील. पालिकेचे कामकाज कसे चालवायचे याची नियमावली आहे. सभागृहाने घेतलेल्या निर्णयाला अनुसरुन प्रशासनाने काम केले पाहिजे. अधिकारी हा राबविणारा असतो.

पदाधिकारी काम करुन घेणारा असतो. पदाधिका-याला अधिकार असतात. त्याच्या कुवतीनुसार तो काम करुन घेतो. पदाधिकारी चाचपडायला लागला की अधिकारी त्याचा फायदा घेतात.

प्रश्न – तुम्ही केलेले कोणते विकासकाम आज शहराच्या दृष्टीने उपयोगी पडत आहे?

उत्तर – सुरुवातीला शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. पालिकेच्या, खासगी शाळा नव्हत्या. शहरामध्ये जास्तीत-जास्त हायस्कूल सरु करण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षणाच्या सोयी, रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधांची निर्मिती केली. विशिष्ट काम केले असे नाही. शहरातील लोकांच्या गरजा भागविण्याचा दृष्टीने प्रयत्न केले.

प्रश्न – पुणे शहराशी तुलना करता. पिंपरी-चिंचवड शहरात काय कमतरता जाणवतेय?

उत्तर – पुणे अनेक वर्ष अगोदर स्थिर झालेले शहर आहे. पिंपरी-चिंचवड शहर नवीन तयार झाले. कालांतराने शहरात एमआयडीसी आली. त्यामाध्यमातून नागरिकांच्या हाताला काम मिळाले. त्यामुळे देशभरातील लोक आकर्षित होऊन शहरात आले.

आजही नागरिक शहरात येत आहेत. त्यादृष्टीतून हे शहर उभे राहत गेले.  पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हा फरक आहे. येणा-या लोकांच्या सोयी-सुविधा करणे पालिका, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे.

प्रश्न – शहरात आणखी काय सुधारणा कराव्या वाटतात?

उत्तर – शहरात विकास कामे चालूच आहेत. परंतु, लोकांचे स्थावस्थ कसे चांगले राहील. यादृष्टीने जागृत राहून प्रशासक, लोकप्रतिनिधींनी काम करावे अशी अपेक्षा आहे.

प्रश्न – राजकारणातील स्मरणीय आठवण आहे का?

उत्तर – आम्ही सरळमार्गी काम करत होतो. चांगल्याशिवाय दुसरे आमच्या डोक्यात कधी येतच नव्हते. प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामणिकपणे पार पाडावी, या हेतूने आम्ही काम करत होतो. त्यामुळे सर्व चांगल्याच आठवणी आहेत. पण, त्यावेळचे राणे नावाचे आयुक्त मीच कोणीतरी वेगळा आहे. असे आमच्यापुढे वागत होते.

सभागृहाला कमी लेखण्याचे काम करत होते. त्यावेळी मी अशा अधिका-याचे करायचे काय असे थोडेसे वक्तव्य केले होते.  माझ्या सभागृहाची, सहका-यांची आब राखण्याच्या दृष्टीने मी बोललो होतो. मीच कोणीतरी आहे असा आयुक्तांचा गैरसमज होता. तो थोडासा दूर करण्याचा प्रयत्न केला होता. ही कटू आठवण आहे.

प्रश्न – त्यावेळेसचे राजकारण आणि आताचे राजकारण काय फरक दिसतोय?

उत्तर – आमच्यावेळचे सरळ, लोकाभिमूख राजकारण होते. आता त्याचा अभाव वाटत आहे. कर्तव्य की संधी म्हणून पाहतात हे महत्वाचे आहे. कर्तव्य म्हणून पाहिले. तर, चांगले आहे. संधी म्हणून पाहिले तर वायफळ होते. कशाची तरी वाट पाहत असतो.

एखादे काम सरळमार्गाने होऊ दिले जात नाही. ते थांबविण्याचे प्रयत्न आता होत आहेत. असे होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

प्रश्न – शहरातील स्थानिक नेतृत्वाला संधी मिळतेय असे तुम्हाला  वाटते का?

उत्तर – आम्ही हे शहर शून्यातून उभे केले आहे. या शहरामध्ये जो राहयला आला. तो या शहराचा मालक आहे, अशी आमची भावना आहे. त्यामुळे स्थानिक आणि बाहेरचा असा भेदभाव आम्ही तेव्हापासून करत नव्हतो आणि आजही नाही. जो लोकाभिमुख काम करेल, राबेल, लोकांना विश्वास देईल, तो नेतृत्व करेल.

आम्ही शून्यातून रोपटे लावले. त्याचा आज वृक्ष वाढत चालला आहे. तो पूर्णात्वाकडे गेला नाही. त्याची वाढ सुरुच आहे. लोक आले म्हणून वाढ झाली. लोक फुकट आले नाहीत. शहरालाही लोकांची आवश्यकता होती. त्यांनी घरेदारे बांधली. ते आज शहराचे मालक झाले आहेत.

 प्रश्न – शहराचा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ व्हावा अशी मागणी आहे. तुम्हाला काय वाटते?

उत्तर – स्वतंत्र लोकसभा मतदारसंघासाठी आम्ही सुरुवातीपासूनच आग्रही होतो. विधानसभेला चार ठिकाणी शहर जोडले होते. बाहेरचाही काही भाग जोडला होता. शहराचे तुकडे केले आणि सोईसाठी राबविले.  असे नसले पाहिजे. एकसंघपणा यायचा असेल. तर, त्यादृष्टीने एक मतदारसंघ केला पाहिजे. मतदारसंघाला शहराचे नाव असले पाहिजे.

प्रश्न- राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना काय संदेश द्याल?

उत्तर – तरुणांनी लोकांच्या कामाकडे लक्ष द्यावे. लोकांना या शहरामध्ये राहण्यासाठी सौख्य कसे लाभेल. त्यादृष्टीने काम केले पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.