Jayashree Kale : कन्येच्या भाव अन्‌‍ अर्थपूर्ण सादरीकरणातून घडले ‘विंदा दर्शन’

एमपीसी न्यूज : ‘कसा मी कळेना’, ‘एका परीचे नाव उनी’, ‘फितुर जाहले तुजला अंबर’, ‘सब घोडे बारा टके’, ‘देणाऱ्याने देत जावे; घेणाऱ्याने घेत जावे’ या आणि अशा अनेक कवितांमधून एका मनस्वी कवीचा सारिपाट उलगडत उलगडत विंदांचे दर्शन घडविले ते त्यांच्याच कन्येने सुहृदांच्या सान्निध्यात..! सव्वा तास रंगलेल्या या काव्यमैफलीत डोळ्यांच्या पापण्या ओलवण्यापासून, हास्यांची कारंजी अन्‌‍ टाळ्यांचा कडकडाट न होता तर नवलच. एक अनोखी दर्जेदार मैफील या निमित्ताने रसिकांनी अनुभवली.

निमित्त होते ते ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक, कवी विंदा करंदीकर यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आयोजित ‘विंदा दर्शन’ या कार्यक्रमाचे. विंदा करंदीकर यांच्या कन्या जयश्री काळे (Jayashree Kale) यांनी विंदांच्याच शैलीत विंदांच्या कविता सादर करून रसिकांना गतकाळात रममाण केले. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांची होती. याच कार्यक्रमात ‘कवी शब्दांचे ईश्वर’ या मालिकेतील ‘मनस्वी कवी विंदा’ हा अक्षरवेध आणि आर्या कम्युनिकेशन ॲन्ड व्हिहिओ निर्मित लघुपट जयश्री काळे यांच्या हस्ते यु-ट्यूबवर प्रसारित करण्यात आला. मालिकेची संकल्पना आणि संगीत राहुल घोरपडे यांची कार्यक्रमात उपस्थिती होती.

भाऊंच्या अर्थात वडिलांच्या कवितांनी आमचे बालपण समृद्ध केल्याचे सांगून जयश्री काळे यांनी विंदांच्या काही बालकविताही सादर केल्या. कष्टप्रद बालपण सोसले असल्याने त्या काळातील परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या ‘शेवटचा लाडू’ या कवितेने रसिकांचे डोळे पाणावले तर महाविद्यालयीन जगतात पाऊल टाकल्यानंतर सौंदर्य डोळाभरून पाहताना युवकाच्या मनीच्या भावना ‘लागेल जन्मावे पुन्हा, नेण्या तुला माझ्या घरी माझी न घाई काही’, या कवितेतून उलगडल्या तर ‘घेऊन जा सर्व माझे काही ठेवू नको, दु:ख माझे एकटीचे तेवढे तू नेऊ नको’ या काव्यातून तर प्रेमभंगाने पीडित युवतीच्या मनातील दु:खद भावना उमटल्या.

Maval : अंध विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लबकडून ऑडिओ पुस्तकांची मदत

पुरुषप्रधान संस्कृतीत कवीमन कसे अस्वस्थ होते ते ‘कर कर करा, मर मर मरा’ या काव्यातून जाणवले. नियमित येणाऱ्या निवडणुका अन्‌‍ दुसरीकडे सर्वसामान्यांची होत असलेली होरपळ याच्यावर भाष्य करणारी ‘सब घोडे बारा टके’ ही कविता उपस्थितांची दाद मिळवून गेली.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरील स्थित्यंतरे, दिग्गजांच्या गाठी-भेटी, जडलेला स्नेह आणि त्यातून झालेली काव्यनिर्मिती हा सारा पट जयश्री काळे यांनी विंदांच्या विविध कवितांमधून उलगडून दाखविला. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ या पंक्ती सादर करून जयश्री काळे यांनी या भावार्थपूर्ण मैफलीचा समारोप केला.

जयश्री काळे यांचा परिचय डॉ. माधवी वैद्य यांनी करून दिला तर सत्कार साधना सरपोतदार यांनी केला. माधवी वैद्य यांचा सत्कार कल्याणी सराफ यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि स्वागत किशोर सरपोतदार यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन अजित कुमठेकर यांनी केले. चारुकाका सरपोतदार, पूना गेस्ट हाऊसची वास्तू आणि कलावंतांमधील अनुबंध डॉ. माधवी वैद्य यांनी उलगडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.