Kalewadi : काळेवाडी परिसरातील टवाळखोरीत वाढ

टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची नगरसेविका नीता पाडाळे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – काळेवाडी परिसरात टवाळखोर तरुणांचा उपद्रव वाढत आहे. याचा परिसरातील महिला आणि मुलींना त्रास होत आहे. शालेय विद्यार्थिनी भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. त्यामुळे या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरसेविका नीता पाडाळे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.
नीता पाडाळे यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना पत्र दिले. त्यात म्हटले आहे की, काळेवाडी मधील तापकीर मळा चौक, भारतमाता चौक, साई पार्क मस्जिद रोड, माने शाळेजवळील परिसर, इंडियन कॉलनी, महाराष्ट्र कॉलनी, सत्संगरोड, विजयनगर या परिसरात टवाळखोर तरुणांचा दिवसेंदिवस उपद्रव वाढत आहे. या भागातील शालेय विद्यार्थिनी, तरुणी आणि महिलांना टवाळखोरांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून महिला छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे.
काळेवाडी परिसरात पोलीस गस्त वाढवून टवाळखोरांचे उपद्रव थांबवावेत. त्यामुळे महिला सुरक्षित होतील. यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर देखील आळा बसणार आहे. असेही या पत्रात म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणा-या शाळा महाविद्यालयांच्या बाहेर विनाकारण घुटमळणा-या तरुणांना पोलिसांनी वेळोवेळी खडसावले आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयांच्या बाहेर आता रोडरोमिओंची गर्दी कमी झाली आहे. मात्र, काळेवाडी परिसरात वसाहतींमध्ये टवाळखोरी वाढली. त्यामुळे आता याचा देखील बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.