Alandi : जमिनीच्या वादातून चुलत भावावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – जमिनीच्या वादातून चुलत भावाने लोखंडी कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 24) दुपारी साडेतीनच्या सुमारास कोयाळी, खिरपाडवस्ती येथे घडली.

बाबुराव नामदेव कोळपे (वय 27, रा. कोयाळी, खिरपाडवस्ती, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अजय उर्फ बापू भाऊसाहेब कोळपे (रा. बालाजीनगर, धनकवडी, पुणे), राजेंद्र जांभळकर (रा. उरळगाव, ता. शिरूर), यांच्या अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबुराव आणि आरोपी अजय या दोघांची कोयाळी येथे समायिक जमीन आहे. त्या जमिनीच्या वादातून अजय याने बाबुराव याच्या डाव्या हातावर लोखंडी कोयत्याने वार केले. अजय आणि त्याच्या साथीदारांनी बाबुराव यांच्या कुटुंबियांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. भांडणात बाबुराव यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी गहाळ झाली. आरोपींनी मारहाण करून निघून जाताना कार मधून पिस्तूल दाखवून बाबुराव आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.