Kalewadi: ‘आमच्या चाळीत का आला’, म्हणत सहा जणांना बापलेकांची मारहाण

एमपीसी न्यूज – ‘आमच्या चाळीत का आला’ असे बोलून एकाला तिघा बापलेकांनी शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. आमच्या चाळीत यायचे नाही, अशी धमकी दिली. तसेच याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पाच जणांना आरोपींनी लोखंडी सळई,  सिमेंट ब्लॉकने जबर मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी साडेसहा वाजता काळेवाडीतील ज्योतिबानगर येथे घडली.

याप्रकरणी विश्वनाथ गंगाधर तेझाड (वय 48), सचिन विश्वनाथ तेझाड (वय 20) आणि विपुल विश्वनाथ तेझाड (वय 22, सर्व रा. आझाद कॉलनी, काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रेखा सतिश लाखे (वय 28, रा. आझाद कॉलनी, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती शुक्रवारी दूध आणण्यासाठी दुकानात जात होते. त्यावेळी त्यांना आरोपी विश्वनाथ तेझाड याने ‘तु आमच्या चाळीमध्ये का आला’ असे बोलून शिवीगाळ केली.

तसेच हाताने मारहाण करत आमच्या चाळीमध्ये यायचे नाही, अशी धमकी दिली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी यांचे पती, सासु, दिर, भावजय आरोपीच्या घराजवळ गेले.

त्यावेळी त्यांच्या चाळीमधील गणेश सर्वेवोड, सुनंदा सर्वेवोड, राकेश वारपुडे, सुमित कांबळे, गणेश कदम हे आरोपी विश्वनाथला समजावून सांगत होते. त्यावेळी त्याने सिमेंटचा ब्लॉक राकेश वापुरडे यांच्या डोक्यात मारला. सुनंदा सर्वेवाड यांच्या डोळ्यावरही मारून जखमी केले.

आरोपी सचिन आणि विपुल यांनी लोखंडी सळईने सुमित कांबळे, विनोद कदम, गणेश सर्वेवोड यांना मारून गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. चव्हाण तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.