तडकाफडकी बदलीनंतर आयपीएस कृष्णप्रकाश शरद पवारांच्या भेटीला 

एमपीसी न्यूज – आयपीएस कृष्णप्रकाश यांची पिंपरी चिंचवडच्या आयुक्त पदावरुन मुंबई येथे तडकाफडकी बदली करण्यात आली.  त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अचानक आणि मुदतपूर्व झालेल्या बदलीमुळे कृष्णप्रकाश नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आज कृष्णप्रकाश हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना बारामतीत जाऊन भेटले असल्याची माहिती समोर आली आहे.  

 

आयपीएस कृष्णप्रकाश आठवड्यापासून सुट्टीवर होते. त्यांनी नुकतीच 126 वर्षे जुनी बोस्टन मॅरेथॉन पूर्ण केली. पण, भारतात परतताच त्यांना बदलीचा आदेश मिळाला असून, ते नाराज असल्याची सर्वदूर चर्चा आहे. तसेच, शहरात देखील अनेक संघटना त्यांची बदली रद्द करण्याची मागणी करत आहेत. गृहखात्याच्या आदेशानंतर लगेचच पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारला. तर दुसरीकडे अद्यापही कृष्ण प्रकाश यांनी नवा पदभार हाती घेतलेला नाही. याच पार्श्वभूमीवर कृष्णप्रकाश यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

 

राज्य सरकारच्या गृहखात्याने बुधवारी (दि. 20) कृष्ण प्रकाश यांच्या बदलीचे आदेश काढले. पिंपरी चिंचवडच्या आयुक्तपदावरुन त्यांची मुंबईत विशेष पोलीस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा येथे बदली झाली. याकाळात ते रजेवर होते. दरम्यान, रजेवरुन माघारी येताच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

 

ठाणे,  कोकण येथील काही अधिकाऱ्यांची देखील अशाच पद्धतीने बदली झाली होती. मात्र त्या बदल्यांना मंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या बारा तासात स्थगिती दिली. शरद पवार यांच्या शब्दाला महाविकास आघाडी सरकारमध्ये किती महत्त्व आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या भेटीनंतर कृष्ण प्रकाश यांच्या बदलीला स्थिगिती मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.