Talegaon Dabhade : नूतन विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा वयाच्या साठीत भरणार स्नेहमेळावा

एमपीसी न्यूज –  सन 1974 -75 या शैक्षणिक वर्षात नूतन विद्या मंदिर या शाळेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने रविवारी (दि. 24)  राम मनोहर लोहिया कडोलकर कॉलनी तळेगाव दाभाडे येथे 47 वर्षानंतर एकत्र येणार आहेत. 47 वर्षांपूर्वी शालेय जीवनात असलेले विद्यार्थी आता वयाच्या साठीत असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि अन्य विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, अशी माहिती समन्वयक मनोहर दाभाडे यांनी दिली.

 

नूतन विद्या मंदिर या माध्यमिक शाळेमध्ये सन 1974 -75 मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी – विद्यार्थिनी सद्यस्थितीला वयाने साठी पार केलेले आहेत. प्रत्येकाच्या पाठीशी पत्नी,  मुलं, सुना, नातवंड असा प्रपंच उभा आहे. यामधील बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या व्यवसायानुसार, नोकरीनुसार दूर राहावयास गेले आहेत. तसेच विद्यार्थिनींचे लग्न झाल्यानंतर त्यांचे लांबवर असलेलं  सासर येथून या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहण्याची तयारी या विद्यार्थ्यींनी दर्शविली आहे. यामध्ये येणारे विद्यार्थी हैदराबाद, बंगलोर, बेळगाव, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणावरून येणार आहेत.

 

या विद्यार्थ्यांमध्ये कोणी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार,  प्रशासन,  महसूल विभाग आदी क्षेत्रांमध्ये उच्चपदावर कार्य करून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. यामध्ये नगराध्यक्ष, बँकेचे अध्यक्ष, शासकीय सेवेत उच्चपद, गायक, लेखक  तर  पत्रकारितेमध्ये आदी ठिकाणी काम करणारी मंडळी उपस्थित राहणार आहेत. पूर्ण 47 वर्षानंतर हा स्नेहमेळावा आयोजित केल्याने तळेगाव तसेच तालुक्यामध्ये  उच्चपदावर काम करणारे विद्यार्थी  सहभागी होणार असल्याने चर्चा होत आहे.

 

या मेळाव्यासाठी त्यावेळचे शिक्षक उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी ॲड पु. वा. परांजपे शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार, मनोहर दाभाडे, बबनराव भेगडे, अविनाश बवरे, सुरेश खांडवे, ॲड. रवींद्र दाभाडे, सोमकांत टकले, कुंडलिक भेगडे, दिपक वाडेकर, मुकुंद करंदीकर, रमेश डोळे, सखाराम जगताप, मधुसूदन खळदे या विद्यार्थ्यांच्या बरोबर संध्या टोके, वासंती गुंड, जयश्री ठोंबरे, संध्या देशमुख, अलका फाकटकर, जयश्री गायकवाड, शुभांगी शहा, दमयंती जगनाडे आदी विद्यार्थिनी मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

 

24 तारखेला सकाळपासून सुरू होणाऱ्या या मेळाव्यात सकाळी चहा, नाश्ता, भोजन, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे सन्मान मनोरंजन आदी कार्यक्रमाचा सहभाग करण्यात आला असल्याची माहिती अविनाश बवरे, सुरेश खांडवे,संध्या टोके यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.