Leh to Kanyakumari : अबब! लेह ते कन्याकुमारी पायी प्रवास पूर्ण करणारा नाशिकचा अवलिया…

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) – दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कितीही अशक्य कार्य असेल तर ते शक्य करता येते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक येथील एका युवकाने लेहपासून सुरु केलेली पायीवारी कन्याकुमारीपर्यंत येऊन समाप्त केली. सुमारे 4,400 किमीचा प्रवास त्याने अवघ्या 200 दिवसांमध्ये पूर्ण केला. ओंकार करपे हे त्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नाशिक येथील आहे.

30 ऑगस्ट 2021 ला लेह येथून त्याने प्रवास सुरू केला. तो पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि कन्याकुमारी पायी प्रवास काल 17 मार्च 2022 रोजी संपन्न केला. पेशाने फोटोग्राफर असलेल्या ओंकारने भारतभ्रमण करण्याचं स्वप्न बघितलेले होते त्यासाठी त्याने ह्या मोहिमेला “ओत्तरहिमाद्रिदक्षिणसमुद्रम्” असे संस्कृत नाव दिले होते. म्हणजेच उत्तरेच्या हिमालयाकडून दक्षिणेच्या समुद्राकडे. ओंकारच्या खडतर प्रवासादरम्यान त्याला अनेक अनुभव मिळाले व त्याने ते वेळोवेळी सोशल अकॉउंट साईटवर अपलोड केले आहेत.

जास्तीत जास्त ग्रामीण भागातून प्रवास..!

ओंकारने प्रत्येक राज्यातून मुख्य रस्त्याने प्रवास न करता ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्याने जास्तीत जास्त  प्रवास केला. त्याने पंजाबमध्ये एका न्यूज अँकरला दिलेल्या मुलाखततीत सांगितले होते की, पायी प्रवास केल्याने भारतातील ग्रामीण संस्कृती व परिस्थिती जवळून पाहता येते व जगता येते.

रोज 25 ते 30 किमी रोज पायी प्रवास!

प्रतिदिनी 25 ते 30 किमी प्रवास करून जिथे अंधार होईल, त्या गावात तो स्थानिकांसोबत राहत असे. मंदिर किंवा कुठेही छत मिळेल, तिथे त्याची राहुटी होती. त्याच्या मते, त्याला प्रवासात प्रत्येक ठिकाणी स्थानिक लोकांनी मदत  केली.

भारतातील प्रत्येक राज्यातील सभ्यता व संस्कृती पाहण्यासाठी प्रवास!

ओंकारने दररोज प्रवासात येणाऱ्या विविध भागातील पैलूंचे दर्शन छायाचित्रामार्फत सोशल मीडियावर प्रसारित केले.  त्याचा मुख्य हेतू भारतातील संस्कृती जाणून घेण्याचा होता. त्याच्या ह्या प्रवासाने त्याची एक वेगळी ओळख  निर्माण  झालेली आहे.

ओंकारने त्याच्या ह्या प्रवासात ज्या लोकांनी त्याला प्रत्यक्ष मदत केली त्यांच्या प्रति त्याने सोशल मीडिया अकाउंट वरून कृतज्ञता व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.