Bhosari News : मुलीचे अपहरण केल्याची आईची तक्रार तर, मुलीनेच मुलाला पळवले म्हणत मामांनी दिली मारुन टाकण्याची धमकी

एमपीसी न्यूज – पंचवीस वर्षीय तरुणाने 17 वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची तक्रार आईने केली. तर, ‘मुलगीच मुलाला पळवून घेऊन गेली असून, आमच्या मुलाला परत घेऊन या नाहीतर तुम्हाला व तुमच्या मुलाला मारुन टाकू,’ अशी धमकी देत मुलाच्या मामांनी मुलीच्या घरी तोडफोड केली. याप्रकरणी तोडफोड करणारे दोन्ही मामांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. दत्तमंदिर समोर, लांडेवाडी, भोसरी येथे बुधवारी (दि.16) ही घटना घडली. 

या प्रकरणी 17 वर्षीय मुलीच्या आईने गुरुवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तीन जणांविरोधात भारतीय दंड विधान कलम 363, 452, 427, 323, 504, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनु उर्फ सौरभ संजय खर्डेकर (वय 25), कल्पेश कुलथे (वय 36) आणि आयुष खर्डेकर (वय 20) (सर्व रा. कासारवाडी, भोसरी) असे गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत. त्यापैकी कल्पेश कुलथे व आयुष खर्डेकर अटक आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्या मुलीला आरोपी सौरभ हा पळवून घेऊन गेला आहे. आरोपी कल्पेश व आयुष हे दोघे फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ केली. ‘तुमची मुलगी आमच्या सौरभला पळवून घेऊन गेली आहे. आमचा मुलगा आत्ताच्या आत्ता आणून द्या, नाहीतर तुम्हाला व तुमच्या मुलाला मारुन टाकू,’ अशी धमकी दिली. आरोपींनी फिर्यादी यांच्या घरातील वस्तूंची तोडफोड केली. कुलर तोडला, कपाट, बाथरूम व घराच्या दरवाजावर लाथा बुक्यांनी घालून नुकसान केले. असे फिर्यादीत नमूद केले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.