Vadgaon maval News : उपनगराध्यक्षपदासाठी दावेदार नसल्याबाबतचे मनसे नगरसेविका सायली म्हाळसकर यांच्याकडून पत्र  

एमपीसी न्यूज –  वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा प्रमिला बाफना यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदासाठी शुक्रवार 9 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. दरम्यान या पदासाठी दावेदार नसल्याबाबत मनसेच्या नगरसेविका सायली म्हाळसकर यांनी लेखी पत्राद्वारे कळविल्याने उपनगराध्यक्षपदाची संधी कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांची सत्ता असून एका गटामध्ये राष्ट्रवादीचे चार, मनसेचे एक व दुसऱ्या गटामध्ये राष्ट्रवादीचे तीन व अपक्ष एक असे नगरसेवक आहे. पक्षांतर्गत निर्णयानुसार राष्ट्रवादीचे राहुल ढोरे, माया चव्हाण, चंद्रजीत वाघमारे व प्रमिला बाफना यांना संधी मिळाली होती.

आता मनसेच्या सायली म्हाळसकर यांना संधी मिळण्याची शक्यता होती, परंतु त्यांनी गटनेत्या प्रमिला बाफना यांना लेखी पत्र देऊन तूर्त उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक नसून आपण दुस-या इच्छुक उमेदवाराचा विचार करावा. त्याचप्रमाणे आपण जाहीर केलेल्या उमेदवाराच्या त्या नावास पाठिंबा देऊन मतदान करण्यास वचनबध्द असल्याचेही स्पष्ट केले आहे.

त्यामुळे उद्या शुक्रवार दि 9 जुलै रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उपनगराध्यक्ष पदाची संधी पुन्हा राष्ट्रवादीलाच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.