Pune News : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री बंद

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव कालावधीत शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती 31 ऑगस्ट, 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर दिवशी बंद राहतील.तसेच गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, 1949 मधील नियम – 142 अन्वये किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती (एफएल-2, एफएल – 3, सीएल – 3, एफएलबीआर – 2, फॉर्म-ई, फॉर्म-ई – 2 वट. ड. – 1) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 31 ऑगस्ट संपुर्ण दिवस पुर्ण पुणे जिल्हा, 9 सप्टेंबर संपुर्ण दिवस पुर्ण पुणे जिल्हा, 10 सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पुणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती तसेच गणेशोत्सवाचा पाचवा व सातवा संपूर्ण दिवस ज्या भागात पाचव्या व सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते, अशा भागातील अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात.याशिवाय ज्या – ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका असेल, त्या-त्या ठिकाणी विसर्जन मिरवणुक मार्गावरील सर्व भागातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद ठेवाव्यात. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, 1949 व त्याअंतर्गत असलेल्या नियमांतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.