Lonand : ओझं ठेवायला त्याने वारीत आणला स्वत:चा मिनी ट्रक !

(अमोल अशोक आगवेकर)

एमपीसी न्यूज – वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या आषाढी वारीला जाण्याचे वेध वारकऱ्यांना दोन-चार महिने आधीपासूनच लागतात. मग लगबग सुरू होते आवरा-आवरीची. शेती-व्यवसायाची कामे, नोकरीतील रजा, वारीच्या दिवसातील कामांची आधीच तयारी करणे यामध्ये वेळ कधी निघून जातो आणि पालख्यांच्या प्रस्थानाचा दिवस कधी येऊन ठेपतो हे लक्षातही येत नाही. या तयारीचा मुख्य भाग असतो आपल्या सोबत सामानाचे किती डाग घ्यायचे?, त्यापैकी कोणते डाग आपल्या दिंडीच्या ट्रकमध्ये ठेवायचे?, जवळ कोणती पिशवी ठेवायची? हे प्रश्न असतातच. पण टेंभुर्णीच्या एका पठ्ठ्याने डागांचे ओझं ठेवायला चक्क ट्रकच यंदाच्या आषाढी वारीत आणला होता. चकित झालात ना? चला तर मग वाचूया, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात ट्रक घेऊन आलेल्या अभिजित अरुण सुतारची ही गोष्ट.

आषाढी वारीच्या वाटेवर रस्त्याच्या उजव्या बाजूने वारीतील मोठ-मोठे ट्रक, टँकर, वाहने जातात आणि डाव्या बाजूने वारकरी चालतात. डाव्या बाजूला लावलेल्या एका ट्रकने लक्ष वेधले. हा ट्रक म्हणजे मोठ्या ट्रकची अगदी हुबेहूब लहान प्रतिकृती होती. लाकडाच्या या मिनी ट्रककडे पाहून बहुतांश वारकरी थांबत होते. जरा विचारपूस केल्यावर त्या ट्रकचा मालक अभिजित सुतार या तरुणाची भेट झाली.

तो म्हणाला, ‘ मी माढा तालुक्यातील टेंभुर्णीला राहतो. माझे वडील गेली 25 वर्षे नेमाने आषाढी पायी वारी करतात. ते आजारी असल्याने यंदाच्या वर्षी मी आणि माझा मोठा भाऊ विजय यांनी वारी पंढरपूरला पोहोचवायचे ठरवले. परंपरागत सुतारकामाची कला अंगात असल्याने टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करण्याकडे माझा कल होताच. त्यामुळे टाकाऊ लाकूड, लोखंड, रबरी चाके यांचा वापर करून मी हा मिनी ट्रक तयार करून ठेवला होता. त्याला साडेचार हजार रुपये खर्च आला. ट्रक तयार करण्यापासून रंगकामापर्यंत सर्व काम मी घरी केले.’

अभिजितचे टेंभुर्णीत रेडियम आर्ट वर्कचे दुकान आहे. त्याचा भाऊ विजय टेम्पो चालवतो. वडिलांची वारी पोहोचवण्यासाठी या दोघांनी पहिल्यांदाच आळंदीपासून पायी वारीला सुरुवात केली. कोणत्याही दिंडीत नाव न नोंदवता आपल्या मिनी ट्रकमध्ये ओझं ठेऊन हे बंधू चालत होते. ट्रकला पुढे जोडलेल्या लोखंडी साखळीने तो ओढला जात होता. ट्रकची बॉडी, ड्रायव्हरची केबिन, नंबर प्लेट, दिंडीच्या काळातील ट्रकला असलेलं रेक्झिनचं हूड, बॅटरीची जागा, मागच्या बाजूला हुडावर लावलेला आळंदी-पंढरपूर वारीचा फ्लेक्स, डिझेलची टाकी, पुढच्या बाजूला माऊली कृपा असं ट्रान्सपोर्टचे नाव, वरच्या बाजूला विजय मंडपवाल्यांचा भोंगा अशा अनेक बारकाव्यांनी सजलेला हा ट्रक सगळ्यांचेच आकर्षण ठरत होता.

‘आम्ही दिंडी सोबत जाणार नव्हतो. त्यामुळे आमचे सामान ठेवण्यासाठी हा ट्रकच वारीला घेऊन जायची कल्पना सुचली. वारीमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करून ओळख निर्माण करण्याची आमची इच्छा होती. ती माऊलींनी पूर्ण करून घेतली. वारीसोबत जाणाऱ्या आलिशान गाड्यांमधून जाणारे लोक उतरून आमच्या ट्रकची चौकशी करत होते. ट्रक आणि आमच्यासोबत फोटो काढून घेत होते. आमचा ट्रक हा टाकाऊतून तयार केला असल्याने टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे, तसेच प्लॅस्टिक मुक्तीचा संदेशही आम्ही देत होतो,’ असेही अभिजितने आवर्जून सांगितले.

घरच्या परिस्थितीमुळे अभिजितला बारावी झाल्यानंतर पारंपरिक व्यवसाय-सुतारकाम आणि रेडियमचं दुकान सुरू करावे लागले. त्याने ट्रकचे हे मॉडेल इतक्या अप्रतिम पद्धतीने सर्व बारकाव्यांसह तयार केलं होतं की वारीतून जाणारे अनेक इंजिनीअरही ते पाहून अवाक् झाले.

अभिजित म्हणाला, ‘ संत ज्ञानेश्वर माऊली सोहळ्यात आमचा ट्रक हे आकर्षण ठरले. अनेक जण तर पुढे चालत गेलेले परत येऊन ट्रक बघून गेले. सर्व वारकऱ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो आणि आमचा सामाजिक संदेशही दिला. अनेकांनी आमचे फोन नंबर घेतले आणि पुण्यातल्या दोघांनी वारीनंतर फोन करून आपल्यालाही असेच मॉडेल बनवून देण्याची मागणीही केली आहे.’ मजल-दरमजल करत या सुतार बंधूंनी आपल्या मिनी ट्रकसोबत आषाढी वारी पांडुरंगापर्यंत पोहोचवली आणि टेम्पोतून टेंभुर्णीला प्रयाण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.