Lonavala : शहरात 59.22 टक्के मतदान; 23 मे रोजी निकाल

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळा ह्या महत्वाच्या शहरात 59.22 टक्के मतदान झाले. लोणावळा शहरातील 44 हजार 263 मतदारांपैकी 26 हजार 213 मतदारांनी त्यांचा मताचा हक्क बजावला. यामध्ये 13 हजार 960 पुरुष आणि 12 हजार 253 महिला मतदारांचा समावेश होता.

लोणावळा शहरात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची धुरा भाजप आणि शिवसेना यांनी सांभाळली होती तर, महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्याकरिता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोर लावला होता. त्यांना शहरात मनसेची देखील साथ लाभली. महायुती व महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवत मागील पंधरा दिवस शहरात घरोघरी जाऊन प्रचार केला.

  • दोन्ही उमेदवारांची प्रचारपत्रके नगरपरिषद निवडणुकीप्रमाणे वाटप केली. त्यातच शेवटच्या दिवशी पार्थ पवार यांच्याकरिता नवनीत कौर यांची तर, श्रीरंग बारणे यांच्याकरिता कांचन कुल यांचा रोड शो झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता. सोमवारी सकाळच्या दोन तासात शहरात मतदानाचा टक्का कमी होता मात्र, साडेनऊ नंतर शहरातील सर्वच 39 मतदान केंद्रांवर मतदानाकरिता रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. दुपारचा काहीसा कालावधी सोडला तर सायंकाळी पुन्हा मतदान केंद्रावर रांगा होत्या. भुशी गाव, पुरंदरे शाळा व पंडित नेहरु विद्यालयात रात्री उशिरापर्यत रांगा पहायला मिळाल्या, आठ वाजण्याच्या सुमारास याठिकाणचे मतदान संपले.

लोणावळा शहरात यावेळी दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार काम केल्याने लोणावळेकर यंदा कोणाच्या बाजूने जनता कौल देणार हे 23 मे चा निकालानंतर स्पषट होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.