BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : लोणावळ्यात मानाच्या दहीहंडी महोत्सवाला सुरुवात

एमपीसी न्यूज- श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी महोत्सवाला लोणावळ्यात आज, शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून सुरुवात झाली.

मावळ वार्ता फाऊंडेशन, स्पेसलिंक केबल नेटवर्क, लोणावळा शहर पत्रकार संघ व सर्व राजकीय पक्ष व संघटना आयोजित लोणावळ्यातील मानाच्या पहिल्या दहीहंडीचे पूजन दुपारी दीड वाजता लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, मावळ वार्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र चौहान, महोत्सव समिती अध्यक्ष जितेंद्र कल्याणजी व पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू येवले यांच्या हस्ते करण्यात आले.

सात लाख 77 हजार 777 रुपयांची आकर्षक बक्षिसे याठिकाणी गोविंदा पथकांकरिता ठेवण्यात आली आहेत. तसेच कोल्हापुर व सांगली पुरग्रस्तांकरिता निधी, शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू पथकाला साहित्यरुपी मदत करण्यात येणार आहे. याठिकाणी सलामी करिता येणार्‍या प्रत्येक गोविंदा पथकाने पुरग्रस्तांसाठी सलामीतील 1 हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. सण उत्सवातील पारंपरिकता जपत दहीहंडी खेळाला व गोविंदा पथकांच्या कलागुणांना वाव देण्यासह पुरग्रस्तांना भरघोस निधी देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा उत्सव समितीचा मानस असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील म्हणाले, “सर्व साहसी खेळांमध्ये गोविंदाचा दहीहंड हा खेळ वेगळा आहे. या खेळात प्रत्येक जण दुसर्‍याला आपल्या खांद्यावर घेत पुढे जाण्याकरिता प्रोत्साहित करत असतो. महाराष्ट्रावर आलेल्या पुराच्या संकटाचा सामना करणार्‍या बांधवांकरिता दहीहंडीचे आयोजक यांनी जमविलेला मदतनिधी व त्यात गोविंदा पथकांनी सलामीतील काही रक्कम जमा करत उचललेला खारीचा वाटा हा कौतुकास्पद असून दहीहंडी खेळाचा उद्देश यामधून सफल झाला असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही”

.