Lonavala Crime News : जमिनीची खरेदी नोंद करण्यासाठी 25 हजारांची लाच घेताना सह दुय्यम निबंधाला एसीबीच्या जाळयात

एमपीसी न्यूज – खरेदी केलेल्या जमिनीची खरेदी नोंद, दस्त करण्यासाठी 25 हजारांची लाच घेताना सह दुय्यम निबंधाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 25) रात्री नऊ वाजता लोणावळा येथे करण्यात आली.

सह दुय्यम निबंधक रवींद्र जनार्दन भोसले (वय 60), खाजगी व्यक्ती रमेश ज्ञानेश्वर आंद्रे (रा. नाणे, ता. मावळ) अशी रंगेहाथ पकडलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीने जागा खरेदी केली आहे. त्या जागेची नोंद, दस्त करण्यासाठी आरोपी सह दुय्यम निबंधक भोसले याने 30 हजारांची लाच मागितली. तडजोड करून 25 हजार रुपये देण्याचे ठरले.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून भोसले याने खाजगी व्यक्ती रमेश आंद्रे याच्याद्वारे 25 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.