Lonavala : लोणावळा उपविभागात दोन ठिकाणी पकडले एमडी ड्रग्स; तीन आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज : संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत (Lonavala) लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी 31 डिसेंबर रोजी दोन ठिकाणी MD ड्रग्स पकडले आहे. कार्तिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

कार्तिक यांनी मावळ परिसरात अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. मावळ परिसरातील ड्रग्सचा वाढता विळखा रोखण्यासाठी व तरुणाईला नशेच्या आहारी जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी तसेच परिसर ड्रग्समुक्त करण्यासाठी कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेतले आहे. जनजागृती करून झाल्यानंतर आता त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कठोर कारवाया हाती घेतल्या आहेत. सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे ताजे व नायगाव परिसरात काही इसम हे मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर एम.डी या अंमली पदार्थाची अतिशय छुप्या पद्धतीने विक्री करत असून त्यामुळे परिसरातील तरुणाई ड्रग्स च्या विळख्यात अडकत चालली आहे.

बातमीचे गांभीर्य ओळखून सहा. पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी अत्यंत कमी वेळेमध्ये सदर आरोपींचे येण्या जाण्याचे मार्ग, त्यांची कार्यपद्धती इ. ची इत्यंभूत माहिती मिळवून त्यांचे पथकासह 30 डिसेंबरच्या रात्रीपासूनच ताजे परिसरात सापळा रचला होता. 31 डिसेंबर रोजी दुपारी 02.25 वाजता आरोपी खंडू कुटे हा बाईकवरून ताजे गावाकडून पिंपळोली गावाकडे येत आहे, अशी माहिती समजताच पथकाने त्यास चहू बाजूंनी घेरले, मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी खंडू कुटे हा कारवाईच्या भीतीने त्याची बाईक भरधाव वेगात पळवत तेथून पसार होण्याचा प्रयत्न करू लागला.

Pune: संध्या’ मैफलीत संतूर, तबला व बासरीचा त्रिवेणी संगम

पोलीस पथकाने जीवाची पर्वा न करता त्यास सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे 30 ग्रॅम वजनाचा 90,000/- किंमतीचा विक्रीसाठी आणलेला एमडी हा अंमलीपदार्थ व त्याची पॅकिंग व विक्री (Lonavala) करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकींग च्या प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण सुमारे 1,30,000 रू/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर रात्री 20.55 वा सत्यसाई कार्तीक यांनी पथकासह नायगाव परिसरात सापळा रचत रोशन चंद्रकांत ओव्हाळ (वय 24 वर्ष, रा.नायगाव), अमीत भरत भानुसघरे (वय 24 वर्ष, रा देवराम कॉलनी कामशेत) हे दुचाकीवरून एमडी हा अंमलीपदार्थ विक्री करण्यासाठी आलेले असताना त्या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.

त्यांची झडती घेतली असता दोघांकडे प्रत्येकी 5 ग्रॅम असा एकूण 30,000 रू किंमतीचा 10 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ मिळून आला आहे. या दोन कारवायांमध्ये 1,20,000 रू किंमतीचा 40 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग व एकूण 2,00,000 रू किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस काॅन्स्टेबल रईस मुलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे विविध कलमान्वये कामशेत पोलीस स्टेशन येथे दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार सचिन गायकवाड, पोलीस हवालदार नितेश (बंटी) कवडे, पोलीस हवालदार अंकुश नायकुडे, पोलीस काॅन्स्टेबल रईस मुलानी, पोलीस काॅन्स्टेबल सुभाष शिंदे, अमोल ननवरे, अंकुश पवार, आशिष झगडे, होमगार्ड सागर दळवी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.