Mangalagaur : किवळे येथे मंगळागौर उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज : पारंपरिक सण उत्सवाची (Mangalagaur) परंपरा जपली जावी, नव्या पिढीला त्याचे आदान प्रदान व्हावे, खेळ व गाण्यांच्या माध्यमातून मंगळागौरीच्या परंपरेचे संवर्धन व्हावे, महिलाच्या कलागुणांना वाव मिळावा या प्रमुख उद्देशाने मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे आयोजन जागृत मित्र मंडळ, समर्थ कॉलनी, विकास नगर, किवळे येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व मंगळागौरीची पूजा करून करण्यात आली. लाट्या बाई लाट्या, फू बाई फू, अठूडं केलं गठूडं अशी प्रचलित गाणी म्हणत वेगवेगळ्या गाण्यांनी हा खेळ रंगत गेला. मंगळागौरीचे खेळ खेळताना स्त्रिया या गाणी म्हणत सूप फिरवत नाचत फुगड्या, लाटण्याने खेळत एकाहून एक सरस गाणी गात झिम्मा, फुगड्या घालत एकमेकिंचा उत्साह वाढवताना दिसल्या. सर्व महिलांची वेशभूषा मराठमोळी व सर्वांनाच भावणारी होती. नऊवारी साडी नेसून, नाकात नथ आणि पारंपरिक दागिने घालून पारंपारिक वेशात नटूनथटून सहभागी झाल्या होत्या.

या जगात धावपळीच्या युगात परंपरा कमी झाल्या आहेत. दैनंदिन कामकाजातून महिलांनी स्वतःसाठी वेळ काढणे कठीण झाले आहे, म्हणून मंगळागौर, भोंडला असे अनेक छोटे छोटे कार्यक्रम साजरे करत मंडळातील महिला एकत्र येऊन आपले सुखदुःख एकमेकींसोबत वाटत परंपरा महिलांनी जपली आहे, असे येथील महिलांनी सांगितले. तसेच स्वत:ची आवड जोपासता यावी. मंगळागौर सणाचे विशेष महत्त्व सर्वांना कळावे, यासाठी या कार्यक्रमाची  जय्यत तयारी करण्यात आली होती.

Maharashtra Kala : अशोकजी परांजपे पुरस्कार डॉ. सुचेता भिडे-चापेकर आणि डॉ. रामचंद्र देखणे यांना जाहीर

कार्यक्रमास ऐश्वर्या राजेंद्र तरस प्रमुख पाहुणे (Mangalagaur) म्हणून लाभल्या होत्या. तसेच भक्ती जगताप, अर्चना रणसिंग, प्रिया जाधव, स्नेहल डोके, नीता देशमुख, स्वाती कदम, उज्ज्वला जाधव, अस्मिता चव्हाण, अंजली, अश्विनी डोके, साक्षी चौरे, दिप्ती जोशी यांनी सहभाग घेतला होता. या महिलांनी केलेल्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक जीवन आनंदी व्हावे, यासाठी सर्वानी प्रार्थना केली व कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.