Manobodh by Priya Shende Part 10 : मनोबोध भाग 10 – सदा सर्वदा प्रीती रामी धरावी

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक दहा.

सदा सर्वदा प्रीती रामी धरावी

सुखाची स्वये सांडी जीवी करावी

देहे दुःख ते सुख मानीत जावे

विवेक के सदा स्वस्वरूपी भरावे

” सदा सर्वदा प्रीती रामी धरावी ” स्वतः रामदास हे परम रामभक्त. ते ह्या श्लोकात सांगताहेत की कायम तुमच्या मनात रामाविषयी प्रीती, प्रेम, जिव्हाळा असू द्यावा. तो अनादी अनंत असा भगवंत आहे, त्याच्याविषयी श्रद्धा बाळगावी आणि आपलं सुख दुःख हे त्यालाच अर्पण करावं. जगताना एक निर्विकारपणा असला पाहिजे. सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने विचलित होऊ नये.

दुसऱ्या चरणात समर्थ म्हणतात की, “सुखाची स्वये सांडी जीवी करावी”. सांडी म्हणजे सोडणे. सुख म्हणजे ऐहीक किंवा भाैतिक सुख सुद्धा आपण म्हणू शकतो. ते सुख सोडायची सुद्धा तयारी असली पाहिजे. आणि ती सवय आपली आपल्याला आपणच लावली पाहिजे. तेवढी निर्विकारता आपल्या मनामध्ये यायला हवी. त्याची शिस्त, सवय जगताना आयुष्यात लागायला हवी. संसारात हे हवं, ते हवं, ते झालं की अजून काहीतरी हवं, ही लोभाची साखळी तुटायला हवी. रस्त्यावर झोपणाऱ्या माणसाला वाटतं की डोक्यावर छप्पर असायला हवं. ज्याच्या डोक्यावर छप्पर आहे, त्याला वाटतं एक चांगलं पक्कं घर असायला हवं. ज्याला पक्कं घर आहे त्याला वाटतं की आपला बंगला असावा. बंगला असणाऱ्याला वाटतं की, आपला अजून एक समुद्राकाठी आलिशान बंगला असावा. तर ह्या सुखाला शेवटच नाही. ही ऐहिक सुखाची व्याख्या आहे, ज्याला अंत नाही.

स्वतःचा ऐहीक सुख आपण होऊन थोडं सोडून, जरा बाकीच्यांचा पण विचार करायला हवा. फक्त स्वकेंद्रित असू नये.

आपल्याला आता कोरोना ना चांगला धडा शिकवला आहे. माणसाकडे पैसा असून तो कोणत्याही सेवा घेऊ शकत नव्हता. संपत्ती असून कुठे बाहेर पडून काही विकत घेता येत नव्हतं. खूप जड गेला हा काळ. सगळं स्वतःच स्वतःला करावा लागत होतं. ही सवय आपल्याला आधीपासून असली असती तर, ह्या परिस्थितीत सुद्धा आपण सुखात राहिलो असतो.
पण माणसांचे खूप हाल झालेत.

तसंच महापूर, अतिवृष्टी, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा चोरीतसुद्धा, आपण जमा केलेलं ऐहीक सुख याची घडी विस्कळीत जाते. खूप नुकसान होतं. आणि आपल्यापासून जे दुरावलं आहे.. गाडी, बंगला, पैसा त्याचं आपण दुःख करत बसतो. तर त्यासाठी फार ऐहीक किंवा भौतिक सुखाच्या मागे न लागता, ते सोडून देता यायला पाहिजे. म्हणजे मनाला क्लेश होणार नाहीत. दुःख होणार नाही. समर्थ म्हणताहेत सुखाला फार कवटाळून बसू नका, तर दे थोडं थोडं सोडून द्यायची सवय लावा.

पुढे ते देहदुःखा विषयी उपदेश करत आहेत. “ते हे दुःख ते सुख मानीत जावे” आपणच सुखाला कवटाळून बसतो, तसंच दुःखही कवटाळून ठेवतो. देह म्हणजे देहाला होणाऱ्या वेदना, यातना, म्हणजेच कष्टं.

माणसाला कष्ट न करता प्रगती करायची असते. पैसा हवा असतो. सुखात राहायचं असतं. संपत्ती गोळा करायची असते, हे सगळं ऐहीक सुखासाठी.

सुख उपभोगायचं तर आहे, पण त्यासाठी माणसाला स्वतःच्या देहाला जिवाला कष्टं द्यायचे नाहीयेत. आणि सत्य तर असा आहे की स्वतः कष्ट केल्याशिवाय, झिजलेल्या शिवाय माणसाची प्रगती होत नाही. काहीही करताना जर मार्गात कष्ट अडचणी खाच-खळगे येत नसतील तर तो कदाचित सन्मार्ग नसेल. आणि चुकीचा मार्ग हा यशाकडे नेत नाही. तर समर्थ म्हणत आहेत की, जे देहाला कष्ट पडत आहेत त्यातच सुख मानत जा. कारण ह्याच कष्टाची सांगली फळं, माणसाला आज नाही तर उद्या निश्चितपणे मिळणार आहेत. त्यामुळे कष्टापासून पळू नका. ते सतत करत रहा. ताक घुसळल्या शिवाय त्यातून लोणी मिळणार नाही.

आणि असं जेव्हा तुम्ही कष्टाला देह दुःखाला जेव्हा सुख मानाल आणि सुखा ला हळूहळू सोडून द्याल, ते पण समर्थ म्हणताहेत की “विवेके सदा स्वस्वरूपी भरावे”.
म्हणजे तुमच्या आत असलेला जो सूक्ष्म जीव आहे ताे विवेकाने भरून जाईल. तुमची पापबुद्धी नष्ट होईल. सदाचरण आणि माणूस वागेल आणि मनात कायम त्या रामाची, सत्याची किंवा त्या अनादि अनंत विषयी ओढ लागेल. त्याच्याविषयी प्रेम जिव्हाळा आसक्ती प्रीती निर्माण होईल. आणि अंतरात विवेक भरलेला असेल.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.