Pune News : रघुनाथ कुचिक विरोधात तक्रार दाखल करायची नव्हती पण, पीडित तरुणीचे चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप

एमपीसी न्यूज : शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्कार करून जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. एका 22 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वारंवार हे प्रकरण लावून धरत रघुनाथ कुचिक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु या संपूर्ण प्रकरणात आता मात्र धक्कादायक माहिती समोर आली. पीडित तरुणीने काल माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले. चित्रा वाघ आणि इतरांच्या सांगण्यावरूनच गुन्हा दाखल केल्याचे तिने सांगितले. 

पीडित तरुणी म्हणाली, मला मदत करण्यासाठी नाही तर रघुनाथ कुचिक यांना गोत्यात आणण्यासाठी हे सर्व सुरू होतं. रघुनाथ कुचिक यांचं काम पाहणारा एक व्यक्ती आहे. तोच व्यक्ती कुचिक यांच्यासंदर्भातली संपूर्ण माहिती अंकल आणि चित्रा वाघ यांना पाठवत होता. त्यातून पुढील सगळ्या गोष्टी घडत गेल्याचे पिडीत तरुणीने  सांगितले. तसेच चित्रा वाघ यांनीच तक्रार देण्यासाठी दबाव टाकला का असे विचारले असता ती म्हणाली, चित्रा वाघ आणि या सगळ्यांनी मिळून माझ्यावर दबाव आणला.

पीडित तरुणी म्हणाली जोपर्यंत मी रघुनाथ कुचिक यांच्यासोबत होते तोपर्यंत माझी सगळी अबोर्शन प्रोसेस सुरू होती. तोपर्यंत सर्व ठीक होतं. कारण मी त्यांना विरोध करून आले होते. त्यानंतर मला वारंवार फोन करून दबाव टाकला जात होता आणि कुचिक यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सांगितले जात होते. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी मला सुसाईड नोट लिहिण्यासाठी देखील सांगितल असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

या तरुणीच्या आरोपानंतर चित्रा वाघ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेने माझ्यावर केलेले आरोप आत्ताच ऐकले. खरं तर वाईट वाटले पण हरकत नाही. असेही अनुभव येतात. फेब्रुवारीपासून एकटी लढणाऱ्या पीडितेसोबत उभे राहिले तेव्हा कोणी तिच्या मदतीला नव्हतं. आता मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र आले. मी सगळ्या चौकशीसाठी तयार असल्याचं ट्विट करून चित्रा वाघ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.