Pune News : कौशल इनामदार यांनी उलगडला मराठी अभिमान गीताचा प्रवास

एमपीसी न्यूज : जोवर एखादे संकट अथवा प्रश्न आपल्या उंबऱ्यातून आत येत नाही तोवर त्याची दाहकता आपल्याला जाणवत नाही. मराठी गाणे हे आपल्या रेडिओ चॅनेलवर लागले तर आपण डाऊनमार्केट वाटू या संभ्रमात असलेल्या रेडिओ चॅनेल्सला कृतीतून ठोस (Pune News) उत्तर देण्यासाठी 112 प्रतिभावान गायक, 356 समूहगान करणारे गायक, 65 वादक, 3 शहरांतील 9 प्रसिद्ध स्टुडीओज आणि तब्बल 2000 जणांचा सहभाग असलेल्या टीमला सोबत घेत सुरेश भट यांनी लिहिलेले ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ हे गीत मराठी अभिमान गीत म्हणून स्वरबद्ध केले.

2010 च्या मराठी भाषा दिनाला हे गाणे मुंबईतील एका प्रमुख खाजगी रेडिओ चॅनेलवर सकाळी सात वाजता सुरु झाले तेव्हा कुठे मनातील सल कमी झाली. आज या घटनेला तब्ब्ल 13 वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा शब्दांत प्रसिद्ध संगीतकार व गायक कौशल इनामदार यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी अभिमान गीताचा प्रवास उलगडला.

कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स व नॉलेज रिसोर्स सेंटर -सेंट्रल लायब्ररी यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत आयोजित कार्यक्रमात कौशल इनामदार बोलत होते. संस्थेच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न पडला.(Pune News) एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, स्कूल ऑफ लिबरल आर्टसच्या प्रमुख डॉ. प्रीती जोशी, प्रमुख ग्रंथपाल डॉ. नितीन जोशी, सामाजिक उपक्रम विभागाचे संचालक डॉ. महेश थोरवे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. मराठी अभिमान दिनाची चित्रफित देखील यावेळी दाखविण्यात आली.

या वेळी बोलताना इनामदार पुढे म्हणाले की, “माझे सर्व शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झाले. मात्र काही दिवस आजारी असताना सहज हातात आली म्हणून मराठी कादंबरी वाचायला घेतली. आपल्याला इंग्रजी, युरोपियन भाषेत जगभरातील समृद्ध लेखन वाचायला मिळेल मात्र माझ्या दैनंदिन जीवनाशी संबंधित भाष्य करणारे, भावना उलगडून दाखविणारे लेखन हे फक्त मराठीत उपलब्ध आहे याची लख्ख जाणीव मला झाली.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग – 28 – प्रतिभावंत पण तितकाच कमनशिबी इरफान पठाण

व्यावसायिक काम करीत असताना मी इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा तीनही भाषांत काम करीत होतो. कामानिमित्त एका रेडिओ जॉकीला भेटीदरम्यान सहजच तुम्ही तुमच्या चॅनेलवर मराठी गाणी का लावत नाही, असे विचारले असता आम्ही चॅनेलवर मराठी गाणी लावली तर आपण डाऊनमार्केट (Pune News) वाटू असा विचार आमचे वरिष्ठ करतात आणि म्हणूनच आम्हाला मराठी गाणी रेडिओवर लावू नका असे सांगण्यात आले आहे या उत्तराने माझा स्वाभिमान दुखावला गेला. आणि पुढच्या सव्वा वर्षांत कोणतेही व्यावसायिक काम न करता मी मराठी अभिमान गीतावर काम केले.”

आज जगभरात 6500 भाषा आहेत त्यापैकी सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठी भाषा ही 11 व्या स्थानावर असून आज 10 कोटी लोक ती बोलतात आणि तरीही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मराठी गाणी लावणे हे डाऊनमार्केट वाटते या वाक्याने मी अस्वस्थ होतो, याचा संताप आला होता, मात्र केवळ राग राग करून नाही तर कृतीतून काहीतरी करायला हवे. स्वत:साठी नाही तर पुढील पिढ्यांसाठी हे करणे गरजेचे आहे ही जाणीव माझ्या मनात होती, असेही इनामदार यांनी सांगितले.

मराठी गौरव गीत म्हणून कोणते गीत निवडायचे हा विचार सुरु असताना अनेक गीते समोर होती. पण काहींमधील खूपसे शब्द आज वापरातच नाही हे लक्षात आले. हे शब्द आपल्या शब्दसंपदेतून गळत चालले आहेत. हे गळणारे शब्द केवळ भाषेचे नाही तर आपलेही नुकसान आहे, असेही इनामदार यांनी आवर्जून नमूद केले. मराठी अभिमान गीताने प्रेरणा घेत ए आर रेहमान यांनी तमिळ अभिमान गीताची रचना केली असेही इनामदार म्हणाले.

भाषा ही आपल्या संस्कृतीची, आपल्या सभ्यतेची वाहक आहे असे सांगत इनामदार पुढे म्हणाले, “आपल्या पूर्वजांचे संचित शहाणपण हीच मराठी भाषा आपल्याला देते. (Pune News) आज जर आपण आपलीच भाषा विसरलो तर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. आई जशी आयुष्य देते तसे जगण्याची ओळख आपल्याला आपली भाषा देते. आपल्याला वीज वाचवायची असेल तर आपल्याला तिचा वापर कमी करावा लागतो. मात्र जर तुम्हाला भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा.”

मराठी अभिमान गीत ते फक्त मराठी मातृभाषा असणाऱ्यांसाठी नाही तर अशा प्रत्येक नागरिकासाठी आहे ज्याला मातृभाषा आहे असेही इनामदार यांनी सांगितले.

मराठी भाषेचा न्यूनगंड अथवा कमीपणा न बाळगता तिचा अभिमान बाळगायला हवा असे सांगत डॉ रविकुमार चिटणीस म्हणाले, “मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना इतर भाषांचा द्वेष नसावा. प्रत्येक भाषेचा आदर आपण प्रत्येकानेच करायला हवा. मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी तिचा प्रचार, प्रसार आणि वापर दैनंदिन आयुष्यात वाढवावा.”

कार्यक्रमानंतर संस्थेच्या आवारात ग्रंथदिंडीचे आयोजन देखील करण्यात आले होते, यामध्ये उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.(Pune News) डॉ संजय उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.