Maval : हिवाळ्यात मानवी वस्तीत आढळतो अतिविषारी घोणस

एमपीसी न्यूज – भारतात आढळणाऱ्या सापांच्या जातींमध्ये घोणस या जातीचा साप (Maval) अतिविषारी वर्गात येतो. हिवाळ्याच्या दिवसात त्याचा मिलनाचा काळ असतो. त्यामुळे तो अंड्यांचे प्रजनन आणि शरीराला ऊब मिळण्यासाठी दिवसा उन्हात आणि रात्रीच्या वेळी मानवी वस्तीत घर आणि परिसरात आढळतो. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात याबाबत नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यायला हवी.

पिंपरी-चिंचवड शहरालगत असलेल्या मावळ परिसरात मोठ्या प्रमाणात वनराई, डोंगर, दऱ्या असल्याने तिथे अनेक जंगली प्राणी आढळतात. सापांचे देखील अनेक प्रकार मावळ परिसरात आढळतात. घोणस या जातीच्या सापांचा हिवाळ्यात मिलनकाळ असतो. त्यासाठी नर आणि मादी घोणस अडगळीच्या ठिकाणांमधून बाहेर पडतात. कडाक्याच्या थंडीत ते स्वतःच्या शरीराचे तापमान वाढविण्यासाठी दिवसा उन्हात येतात. तर रात्रीच्या वेळी शेणखत, बाथरूमचा पाईप, पाईपद्वारे घरात, दाराच्या फटीतून घरातील उबदार ठिकाणी जाऊन बसतात.

घोणस हा बोजड शरीराचा साप आहे. त्यांची लांबी सुमारे तीन ते पाच फूट असते. डोके मोठे, चपटे व त्रिकोणी आणि (Maval) मानेपासून वेगळे दिसते. डोके व पाठीवर लहान लहान बदामाच्या आकाराचे शल्क (खवले) असतात. त्याची शेपटी लहान असते. पाठीकडचा रंग फिकट ते गडद तपकिरी असतो. प्रत्येक ठिपक्याच्या कडेला पांढरी किनार असते. पोटाचा खालचा भाग फिकट पांढरा व त्यावर रुंद, आडवे पट्टे असतात. त्याच्या फुत्काराचा आवाज मोटारीच्या चाकातील हवा सोडताना होणाऱ्या आवाजासारखा असतो.

Bhosari : माजी उपहापौर सुदामराव लांडगे यांचे निधन

हिवाळ्याच्या दिवसात बागकाम करणारे, शेतकरी, निसर्गभ्रमंती करणारे आणि गिर्यारोहक यांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे. अडगळीच्या ठिकाणी काम करताना घोट्याच्या उंचीपेक्षा जास्त उंचीचे बूट वापरावे. अडगळीच्या ठिकाणी अथवा प्रत्यक्ष डोळ्यांनी न दिसणाऱ्या ठिकाणी थेट हात न घालता अगोदर काठी फिरवावी. हालचाल झाल्याचे लक्षात येताच तिथे असणारे सरपटणारे प्राणी निघून जातील. बाथरूमच्या पाईपला जाळी बसवावी. दरवाजे, खिडक्या बंद केल्यानंतर फट राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. छताच्या, भिंतीच्या फटी व्यवस्थित बुजवून घ्याव्यात. अनेकदा अशा फटीतूनच साप घरात येत असतात.

मांजराची नजर अतिशय तीक्ष्ण असते. मोकळ्या जागेत रहाणाऱ्या नागरिकांनी मांजर पाळणे खूप फायद्याचे ठरते. या सापाचा मुख्य नैसर्गिक शत्रू म्हणजे मुंगुस. मुंगुस परिसरात वावरत असेल तर तिथे घोणस आणि इतर सापांची संख्या नियंत्रणात असते. घोणस हा साप अतिशय ताकदवान असतो. तो पहाटे व रात्रीच्या वेळी क्रियाशील असतो. दिवसा देखील तो निर्धास्तपणे वावरतो.

घोणस मादी सापाच्या पिलांना जन्म देते. इतर सापांप्रमाणे घोणस मादी अंडी घालत नाही. अंडी मादीच्या पोटातच मोठी होतात. घोणस साप सहसा स्वतःहून माणसावर हल्ला करत नाही. एखादी असुरक्षित क्रिया, हालचाल, हल्ला झाल्याचे लक्षात येताच तो प्रतिहल्ला करतो. घोणसाच्या दंशामुळे मानवी शरीरातील रक्ताच्या गुठळ्या होतात अथवा रक्त कोशिका फुटतात. मूत्राशय निकामी होण्याची शक्यता असते. घोणस सापाचा दंश होताच तत्काळ सरकारी रुग्णालयात जाऊन प्रतिविष टोचणे हाच त्यावर इलाज आहे. जेवढ्या लवकर प्रतिविष घेतले जाईल, तेवढ्या लवकर रुग्ण बरा होण्यास मदत होते. तसेच मृत्यूचाही धोका (Maval) टळतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.