Maval : शेवटपर्यंत सतर्क राहून प्रचार करा – रवींद्र मिर्लेकर

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आकुर्डीत बैठक

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप- शिवसेना-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे. त्यासाठी झोकून कामाला लागा. प्रचाराची पत्रके वाटावीत. घराघरात जाऊन प्रचार करण्यात यावा. मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत सतर्क राहून प्रचार करा अशा सूचना शिवसेनेचे विभागीय संपर्क प्रमुख, माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप- शिवसेना-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आकुर्डीतील विठ्ठ्ल मंदिरात शुक्रवारी (दि. 12)आढावा बैठक झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पिंपरीचे शिवसेना आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, पिंपरी विधानसभा प्रमुख, नगरसेवक प्रमोद कुटे, माऊली थोरात, भाजपचे प्रदेश सदस्य अमित गोरखे, माजी नगरसेवक मधुकर बाबर, राजू दुर्गे, उत्तम कुटे, कैलास कुटे, रोमी संधू यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची संख्या मोठी होती.

रवींद्र मिर्लेकर म्हणाले, “महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी मागील पाच वर्षात उत्तम काम केले आहे. संसदेत त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. मतदारसंघात विकासाची कामे केली आहेत. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा श्रीरंगआप्पा संसदेत गेले पाहिजेत. आपली कामे झाली पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी अप्पांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावे”

“संघटनात्मक बांधणी व्यवस्थित झाली पाहिजे. बूथ कमिटीचे अंत्यत सूक्ष्मपणे व्यवस्थापन करण्यात यावे. सगळीकडे प्रचाराची पत्रके वाटण्यात यावेत. घरा-घरात जाऊन प्रचार करावा. कोणीही गाफील राहू नये. शेवटच्या घटकापर्यंत मतदारांना मतदानासाठी बाहेर आणा. मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत सतर्क राहून प्रचार करण्यात यावा” असे मार्गदर्शन मिर्लेकर यांनी केले.

नगरसेवक प्रमोद कुटे म्हणाले, “खासदार श्रीरंग आप्पा यांनी मागील पाच वर्षात मोठी विकासकामे केली आहेत. आप्पा जनतेशी एकरुप असणारे खासदार आहेत. मतदारसंघातील प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्यामुळे आकुर्डी परिसरातील सर्व नागरिकांनी आप्पांशा पाठिशी ठामपणे उभे रहावे” आढावा बैठकीचे नियोजन फारुख शेख, बबलू खान यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.