Pimpri : विद्यार्थ्यांनो भावनिक होऊन मतदान करु नका – अजित पवार

एमपीसी न्यूज – निवडणुकीस इच्छुक उमेदवारांची स्वत:ची ध्येयधोरणे, उद्दिष्टे हवी. आता फक्त आश्वासनांवर काम भागत नाही. त्यामुळेच शिक्षित, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विद्यार्थ्यांनो भावनिक होऊन मतदान करु नका. असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आकुर्डी येथे विद्यार्थ्यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, माजी महापौर योगेश बहल, सारंग पाटील. राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, प्रवक्ते फजल शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, पिंपरी विधानसभेचे विद्यार्थी अध्यक्ष प्रतीक इंगळे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, “माणसांच्या जाती काढून यांनी राजकारण केले आणि आता देवांच्या जाती काढून हे भाजपावाले राजकारण करत आहेत. यांच्या सुपीक डोक्यातून या कल्पना येत आहेत. हे तुमचं माझं सरकार नसून सुटाबुटातील लोकांचे आहे” अशी टीका अजित पवार यांनी केली.

“दोन कोटी युवकांना रोजगार देऊ असे या सत्ताधा-यांनी सांगितले. मात्र नोटाबंदी करुन छोटे – मोठे उद्योग धंदे देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. महाराष्ट्र युती सरकाने कोणतेही विकासकामे केली नाही. राष्ट्रवादी पक्षाने यावर्षी युवावर्गाला संसदेमध्ये पाठविण्यासाठी तरुण उमेदवार उभा केला आहे. जातीयवादी आणि जनतेची फसवणूक करणा-या भाजप युतीला धडा शिकविण्यासाठी मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे पार्थ पवार तर शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे या उमेदवारांना निवडून द्यावे” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे म्हणाले की, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून विद्यार्थी संवाद अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना उमेदवाराचा प्रचार कसा करायचा याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. पक्षाचा प्रचार घरांतून सुरु करुन तो नातेवाईक, मित्र, स्नेही यांच्यामार्फत करा. प्रत्येकाला पक्षाची ध्येयधोरणे सांगितली आहेत.

हीच भाजपची संस्कृती का ?

भाजप – शिवसेना महायुतीच्या अमळनेर येथील मेळाव्यात झालेल्या जोरदार राड्यानंतर आज अजित पवार म्हणाले, “हीच का भाजपची संस्कृती “? त्यानंतर अहमदनगर येथील झालेल्या पंतप्रधानाच्या सभेत खासदार दिलीप गांधी यांना बोलू दिले नाही, हे भाजपच्या कोणत्या संस्कृतीत मोडते असा सवालही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.