Maval: लोकसभेची उमेदवारी लक्ष्मण जगतापांना द्या; मुख्यमंत्र्यांकडे भाजप नगरसेवकांची मागणी

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपकडे घेण्यात यावा. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या बारणे कुटुंबातील नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (मंगळवारी) एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले आहेत. त्यावेळी पिंपरी महापालिकेतील बारणे कुटुंबातील नगरसेवकांनी मावळातून आमदार जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांच्याकडे केली. या निवदेनावर नगरसेवक अभिषेक बारणे, कैलास बारणे, झामाबाई बारणे, माया बारणे, अर्चना बारणे यांच्या स्वाक्ष-या आहेत. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके यांच्यासह चिंचवड मतदारसंघातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

शिवसेना-भाजपची युती झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड मतदारसंघाचा आणि स्थानिक प्रश्नांचा विचार करता मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे घ्यावी. उमेदवारी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना मिळावी, अशी आमची बारणे कुटुंबातील नगरसेवकांची  इच्छा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतरही मावळ लोकसभेच्या जागेवरुन ताणाताणी होणार आहे.

काही दिवसांपुर्वी शहरात आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देखील भाजप नगरसेवकांनी युती झाल्यास शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत बारणे शिवसेनेचे उमेदवार असल्यास आणि युती झाल्यास तर आम्ही त्यांचे काम करणार नसल्याची भुमिका घेतली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.