Maval News : तालुक्यातील ग्रामपंचायतींना फिल्टरसह पाणी योजनेस त्वरित मंजुरी मिळण्याची मागणी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कामशेत, कान्हे, टाकवे, जांभूळ, चिखलसे, नाणे, साते आदी ग्रामपंचायतींना फिल्टरसह पाणी योजनेस त्वरित मंजुरी मिळावी याबाबतची मागणी जांभूळचे माजी सरपंच संतोष जांभुळकर, कान्हे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच विजय सातकर व सातेचे माजी सरपंच प्रकाश आगळमे यांनी मावळचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातील कामशेत, कान्हे, टाकवे, जांभूळ, चिखलसे, नाणे, साते या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत आहे. वाढती लोकसंख्या व गृहप्रकल्प पाहता मोठ्या प्रमाणावर सांडपाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडले जाते. टाकवे औद्योगिकक्षेत्रामधील कंपन्यांचे सांडपाणीदेखील नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे संपुर्ण पाणी दुषित झाले आहे.

इंद्रायणी नदीवर या सर्व ग्रामपंचायतींच्या जॅकवेल विहिरी असल्यामुळे दुषित पाण्याचा पुरवठा होत असून अनेक कुटुंब आजारी पडत आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या सर्व परिसरात या पाण्यामुळे साथीचे आजार पसरले असून अनेक कुटुंबे हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शासनाच्या जलजीवन मिशन (पाणीयोजना) यामध्ये वरील सर्व ग्रामपंचायतीस प्राधान्य क्रमाने फिल्टर पाणी योजना मंजूर करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

याबाबतच्या निवेदनाच्या प्रती मावळचे आमदार सुनील शेळके, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनाही देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.