Maval News: इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रियंका इंगळेकडे महाराष्ट्र खो-खो संघाचे नेतृत्व

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील - रामदास काकडे

एमपीसी न्यूज – जबलपूर मध्यप्रदेश येथे 26 ते 30 डिसेंबर 2021 या कालावधीत होणाऱ्या 54 राष्ट्रीय महिला राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेसाठी इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका इंगळे हिच्याकडे महाराष्ट्र खो-खो संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

संस्थेचे खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील – रामदास काकडे

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी तिचे कौतुक केले. तसेच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य सिद्ध करतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर येथे झालेल्या 57 व्या महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रियंका इंगळे हिने पुणे जिल्हा खो खो संघाचे नेतृत्व केले. तर ऋतिका राठोड हीने संघाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत पुणे संघाचे यशस्वीपणे प्रतिनिधित्व करताना भक्कम संरक्षण व धारदार आक्रमण अशा दोन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करत राज्य अजिंक्य पदाला गवसणी घातली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रियंका इंगळे हिला राणी अहिल्या या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

प्रियंकाच्या दमदार कामगिरीमुळे जबलपूर मध्यप्रदेश येथे 26 ते 30 डिसेंबर 2021 या कालावधीत होणाऱ्या 54 राष्ट्रीय महिला राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेसाठी प्रियंका इंगळे हिच्याकडे महाराष्ट्र खो-खो संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

तिच्या या यशाबद्दल इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी आनंद व्यक्त केला. यापुढील काळातही इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे खेळाडू राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य सिद्ध करतील असे संस्थेचे धोरण राहील अशी ग्वाही काकडे यांनी दिली.

संस्‍थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष गोरखनाथ काळोखे, डॉ. दीपक शहा, खजिनदार शैलेश शहा, सदस्य विलास काळोखे, निरुपा कानिटकर, संदीप काकडे, महाविद्यालय विकास समिती सदस्य परेश पारेख, चंद्रभान खळदे, प्राचार्य डॉ. एस के मलघे यांनी प्रियंका इंगळेला शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयात खो खो खेळाचे दर्जेदार प्रशिक्षण सकाळी साडेसहा ते आठ या वेळात सुरू आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय मार्गदर्शक महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक सुरेश थरकुडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.