Maval : यंदाची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती – सदाशिव खाडे

प्रभाग क्रमांक दहा येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. या निवडणुकीत महायुतीच्या जनशक्तीचा विजय होणार आहे. या जनशक्तीपूढे विरोधकांच्या धनशक्तीचा निभाव लागणार नाही, असे मत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दहा मधील मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिका-यांची चिंचवड येथे बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार बारणे बोलत होते. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक केशव घोळवे, सुप्रिया चांदगुडे, माऊली थोरात, तुषार हिंगे, उर्मिला काळभोर, शिवसेना सल्लागार मधुकर बाबर, शहराध्यक्ष योगेश बाबर, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, राजाभाऊ गोलांडे, अनंत को-हाळे, बाळासाहेब भागवत, शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीच्या घटकपक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सदाशिव खाडे म्हणाले, “यंदाची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. महायुतीकडे जनशक्ती हे अस्त्र आहे. त्या बळावर महायुती विजयी होणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येणार आहेत.”

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या घटकपक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या पुढे एक पाऊल पुढे टाकत प्रामाणिकपणे काम केलं. त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून मला मागील पाच वर्ष देशाच्या संसदेत काम करता आलं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच काम केलं आहे. अनेक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून काही अफवा पसरविण्याचे काम जाणीवपूर्वक केलं जात आहे. त्याकडे लक्ष न देता आपल्या सरकारने केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवायला हवं. राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मावळ मतदारसंघात प्रचार करत आहेत. मागील कित्येक वर्षात त्या पक्षाला प्रचारासाठी सुद्धा कार्यकर्ता निर्माण करता आला नाही” असे म्हणत लोकांना मतदान करण्यासठी प्रवृत्त करण्याचा सल्ला देखील त्यांनी उपस्थितांना दिला.

आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, “खासदार श्रीरंग बारणे यांनी स्थानिक प्रश्नांसह राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांना देशाच्या संसदेत मांडून त्यांचा पाठपुरावा करून ते सोडविले आहेत. त्यांनी त्यांची खासदारकी सिद्ध केली आहे. महायुतीमध्ये विरोधकांचे कोणतेही हल्ले उडवून लावण्याची ताकद आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या कार्यक्षेत्रात काम करावं”

चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या, “येत्या निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे सरकार निवडून येणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारणे मागील पाच वर्षात अत्यंत चांगले काम केले आहे. त्यामुळे मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत जास्त मताधिक्य मिळेल. सर्व घटकपक्षांनी एकत्रितपणे डोळ्यात तेल घालून काम करावे.”

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमित गोरखे यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘मावळ लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. संपूर्ण देशाचे या मतदारसंघातील निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मावळ मतदारसंघातील जनता भरघोस मताधिक्याने निवडून देऊन इतिहास रचणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून बारणे यांचे काम प्रत्येक मतदार नागरिकांपर्यंत पोहोचवायला हवे. प्रभाग स्तरावर नियोजन झाले असून सर्व कार्यकर्ते सक्रियपणे काम करत आहेत, असे अमित गोरखे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.