Pimpri : शहरातील भुयारी मार्ग अन्‌ रस्त्याच्या कडेच्या भिंतीवर वन्यप्राण्यांची चित्रे

महापालिकेतर्फे शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सिमेंटच्या जंगलातही लहान मुले व तरुण नागरिकांना जंगलातील प्राण्यांचे हुबेहूब दर्शन घडवण्यासाठी महापालिकेचा पर्यावरण विभाग सज्ज झाला आहे.  त्याचाच एक भाग म्हणून पिंपरीतील हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीसमोरील भुयारी मार्गाचे पेंटिंगद्वारे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. भुयारी मार्गाच्या दुतर्फा असलेल्या भिंतीवर वृक्ष, वेली, प्राणी यांचे चित्र रेखाटण्याचे काम सुरु आहे. भुयारी मार्गातून जाताना भिंतीवरील ही चित्रे वाहनचालकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पिंपरीगाव व डेअरीफार्म कडून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम)आणि वल्लभनगर एसटी स्टँडकडे जाण्यासाठी तयार केलेल्या कै. संदीप वसंतराव शेवडे भुयारी मार्गाच्या दुतर्फा महापालिकेच्या पर्यावरण विभागांतर्गत भुयारी मार्गाचे सुशोभीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा, अस्वल या हिंस्र प्राण्यांसह हरीण, काळवीट हे प्राणी व डोंगरद-या, टेकड्या यांचे हुबेहूब रेखाटन करण्यात आले आहे.

यामुळे रस्त्यावरून येणार्‍या जाणारे वाहन चालक व प्रवाशांसह लहान बाळ गोपाळ आवर्जून थांबून या कृत्रिम निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत आहेत. येथे मत्सालयाप्रमाणे एक्वेरियम चित्र रेखाटण्यात येणार असून विविध रंगातील मासे शहरवासीयांना पाहायला मिळणार आहेत. इंद्रायणीनगर येथील स्पाईन सर्कल येथे देखील अशाच प्रकारे भिंती रंगविल्या आहेत. तेथे कार्टून चित्रे भिंतींवर साकारण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.