Pimpri : ‘इनक्युबेशन सेंटर’च्या उद्घाटनाकडे महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापतींनी फिरविली पाठ

उद्घाटनासाठी आयुक्त तब्बल एक तास उशिरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी, ऑटो क्‍लस्टर आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्तपणे सुरू करण्यात आलेल्या ‘इनक्युबेशन सेंटर’च्या उद्घाटनाकडे स्मार्ट सिटीचे संचालक महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी पाठ फिरविली. महापालिकेत बसणेच त्यांनी पसंत केले. संचालकांनीच उद्घाटनाकडे पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

इनक्युबेशन सेंटरचे दालन चिंचवडच्या ऑटो क्‍लस्टर येथे सुरू करण्यात आले आहे. उद्घाटनाची वेळ आज (गुरूवारी) दुपारी तीन वाजताची होती. सत्ताधारी पक्षातील स्मार्टचे संचालक फिरकले नाहीत अन् स्मार्ट सिटीचे सीईओ असलेले आयुक्त हर्डीकर देखील तब्बल एक तासाने उशिराने आले. त्यानंतर आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

स्मार्ट सिटीचे संचालक, विरोधी पक्षनेते नाना काटे, सचिन चिखले, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, ऑटो क्‍लस्टरचे किरण वैद्य, प्रशांत गिरबाले, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण, प्रवीण तुपे, समन्वयक दिलीप गावडे आदी उपस्थित होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘इनक्युबेशन सेंटर’मुळे शहरातील विद्यार्थ्यांच्या नव्या कल्पना आणि संधींना चालना मिळणार आहेत. त्यातून नवा उद्योग व व्यवसाय निर्माण होऊन शहर विकासाला चालना मिळणार आहे.  शहरात विकासाला उद्योगामुळे चालना मिळाली आहे. पुण्यात राहणारे आता शहरात राहण्यास प्राधान्य देत आहेत. राहण्याजोगे शहर झाल्याने पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या 25 लाखांच्या पुढे गेली आहे. विद्यार्थ्यांच्या नवनव्या संशोधन, कल्पनांमुळे नवे उद्योग तयार होऊन शहराच्या विकासात भर पडेल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like