MLA Dilip Mohite Patil News : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना ‘हनी ट्रॅप’ जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न ? संबंधित युवतीनेच केली भांडाफोड

एमपीसी न्यूज – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी त्यांना सातारा येथे ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. याबाबत तीन जणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी), राहुल किसन कांडगे (रा. चाकण), सोमनाथ दिलीप शेडगे (रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

आमदार दिलीपराव मोहिते-पाटील यांचे पुतणे मयूर साहेबराव मोहिते-पाटील यांनी याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी तसेच त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यासाठी संशयित तिघांनी आमदार मोहिते-पाटील यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचा डाव आखला. संशयितांनी एका युवतीला ‘हनी ट्रॅप’साठी काही रक्कम देखील दिली.

मात्र, त्या युवतीनेच संशयितांचा भांडाफोड करून हा प्रकार समोर आणला. साताऱ्यातील या युवतीने फोन करून याबाबत माहिती दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अद्याप अटक झालेली नाही. पोलीस निरीक्षक सजन हंकारे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.