Rajgurungar News : आमदार मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश; खेड सिटी 220 केव्ही विद्युत केंद्राला मंजुरी

एमपीसीन्यूज : खेड तालुक्यातील राजगुरूनगर आणि खेड एसईझेड परिसरातील लोडशेडिंगचा प्रश्न निकाली निघणार आहे. खेड सिटी येथे 220 केव्ही विद्युत केंद्र उभारणी करण्यास महापारेषण कंपनीची मंजुरी मिळाली असून, यासाठी राबविण्यात येणारी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच कार्यादेश काढून प्रत्यक्ष कमला सुरुवात होणार असल्याची माहिती खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.

खेड तालुक्यातील राजगुरूनगर आणि खेड एसईझेड परिसरात लोडशेडिंगची समस्या भेडसावत होती. त्यामुळे शेतकरी,उद्योजक आणि सवर्सामान्य नागरिकांना कायम विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते.

या भागातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी रेटवडी येथील खेड सिटी 220  विद्युत केंद्र उभारणाची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यासाठी आमदार मोहिते पाटील यांनी सातत्याने पाठपुरावाही केला.

त्यानुसार खेड सिटी येथे 220  केव्ही विद्युत केंद्र उभारणी करण्यास महापारेषण कंपनीकडून मंजुरी मिळाली. तसेच यासाठी विद्यूत नियामक मंडळाकडूनही तत्वतः मान्यता देण्यात आली. शिवाय या केंद्रासाठी कन्हेरसर येथे एकूण 6.76 हेक्टर खासगी जमीन महापारेषण कंपनीकडून ताब्यात घेण्यात आली आहे.

सध्या येथे विद्युत केंद्र उभारणीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच या कंत्राटदाराला कामाचे कार्यादेश निघून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती महापारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी कळविली असल्याचे आमदार मोहिते पाटील यांनी सांगितले.

कन्हेरसर येथे उभारण्यात येणाऱ्या विद्यूत केंद्रामुळे राजगुरूनगर आणि खेड एसईझेड परिसरातील विजेची समस्या दूर होणार असल्याचे आमदार मोहिते पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.