Chinchwad : टाटा मोटर्समध्ये मॉक ड्रील

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड (Chinchwad ) महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, औद्योगिक सुरक्षा महामंडळ आणि टाटा मोटर्स यांच्या वतीने औद्योगिक वायुगळती रोखण्याच्या दृष्टीने ‘ऑन साईट जॉईंट मॉक ड्रील’चे चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीत घेण्यात आले.

Hinjwadi : ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकासह संचालकावर गुन्हा

या मॉक ड्रीलला आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, अग्निशमन अधिकारी उदय वानखेडे, औद्योगिक सुरक्षा महामंडळ सहसंचालक संजय गिरी, टाटा मोटर्स सुरक्षा अधिकारी राकेश पांडे, कारखाना व्यवस्थापक प्रशांत जोशी, आपत्ती नियंत्रक शशिन पाटील, टाटा मोटर्स कामगार संघटनेचे प्रतिनिधी संतोष संकपाळ, अबिद सय्यद तसेच कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये संकटावर कशा प्रकारे मात करता येईल हा या मॉक ड्रीलचा उद्देश होता. अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर किती कालावधीमध्ये अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचू शकते तसेच इतर यंत्रणा किती कालावधीमध्ये प्रतिसाद देऊ शकतात हे समजून घेणेही तितकेच महत्वाचे आहे.

दर तीन महिन्याला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल तसेच यामध्ये बाकीच्या कंपन्यांचाही समावेश असणार आहे. यामध्ये स्वयंसेवकांचेही सहकार्य लाभणार असून सामान्य नागरिकांना अग्निशमन विभागाकडून आपातकालीन संकटांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, या मॉक ड्रीलबद्दल कोणालाही माहिती देण्यात आली नव्हती. सगळ्या अग्निशमन अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत इथे बोलावण्यात आले होते. जर अशी परिस्थिती ओढावली तर अग्निशमन दल किंवा वैद्यकीय दल आणि संबंधित यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यास आणि परिस्थिती आटोक्यात आणण्यास किती वेळ लागतो हे पाहण्यासाठी आज या मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिका आणि टाटा मोटर्सच्या अग्निशमन दलाने खुप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. पुढेही महापालिका अशा कार्यक्रमांचे आयोजन करत राहील जेणेकरून शहरातील कंपन्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि संकटकाळी परिस्थिती कशी हाताळावी याची त्यांना पुर्वकल्पना येईल.

यापुढेही आयुक्त शेखर सिंह यांच्या सुचनेनुसार एन. डी. आर. एफ आणि पोलिस दलाच्या सहभागातून ऑफ साईट आणि ऑन साईट मॉक ड्रील दर तीन ते चार महिन्यांनी घेण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. यावेळी टाटा मोटर्सचे कारखाना व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी या मॉक ड्रीलचे आयोजन केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.