Moshi : वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाद्वारे प्रतिदिन 12 मेगावॅट वीजनिर्मिती

एमपीसी न्यूज – महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी (Moshi) प्रतिदिन 700 टन क्षमतेच्या प्रकल्पामधून 12 मेगावॅट वीजनिर्मिती होत असून येत्या काही दिवसांत हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. त्यातून 14 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाईल, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे तसेच पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करणे हा उद्देश या प्रकल्पाच्या माध्यमातून साध्य होत असून महापालिकेच्या खर्चातही बचत करणारा हा प्रकल्प ठरत आहे, असेही आयुक्त सिंह म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण होणाऱ्या दैनंदिन सुमारे 1 हजार 150 मेट्रिक(Moshi) टन कचऱ्यावर मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाते. त्यातील 700 मेट्रिक टन कचऱ्यापासून 14 मेगावॅट वीजनिर्मिती करणे हे वेस्ट टू एनर्जी म्हणजेच कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प डीबीओटी तत्वावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नुसार विकसित केला गेला असून त्यांच्यामार्फत 21 वर्षे कालावधीसाठी चालवला जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन विनियम 2016 चे पालन करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून कार्बन उत्सर्जनावर लक्ष ठेवण्यासाठी कार्बन उत्सर्जन निरिक्षण कार्यप्रणालीचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे 7 लाख टन कार्बन उत्सर्जन रोखले जाणार आहे.

Maharashtra :बाबा महाराज सातारकर हे ईश्वरीप्राप्त गायन शैलीतून भक्तीचा संदेश देणारे – सुचेतामाई गटणे

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प चालविण्यासाठी सुमारे 2 मेगावॅट वीज लागत असून उर्वरित वीज ओपन ऍक्सेस पद्धतीने महापालिकेच्या वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट आणि मैलाशुद्धीकरण केंद्रांसाठी वापरण्यात येत आहे. हा प्रकल्प शहरामध्ये गोळा होणाऱ्या कचऱ्याच्या गुणधर्मांचा विचार करून तयार करण्यात आला असून त्यामध्ये कचऱ्याचे पुर्ण क्षमतेने ज्वलन व्हावे यासाठी मुव्हींग ग्रेटचा वापर करण्यात आलेला आहे.

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, या प्रकल्पाच्या आधारे केवळ कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. तर, यामुळे महापालिकेच्या वीज बिलामध्येही भरीव बचत होत आहे. हा प्रकल्प भारत सरकारची ग्रीन ओपन ऍक्सेस पॉलिसीही संरेखित करतो. शहराला नाविन्यपूर्ण बाबींमध्ये पुढे घेऊन जाण्याचा महापालिकेचा निर्धार आहे.

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी चिखली येथील मैलाशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया केलेल्या 5 एम.एल.डी पाण्याचा वापर करण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची बचतही होत आहे. महापालिकेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प कार्यान्वित झाला असून यामुळे कचरा डंपिंगसाठी अधिकच्या जागेची गरज भासत नाही. शिवाय महापालिकेच्या वीज बिलातही बचत होत आहे.

ग्रीड सिंक्रोनायझेशनसह वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सहाय्याने 17 ऑक्टोबरपर्यंत एकूण 22.88 लाख युनिट वीज निर्मिती केली गेली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने 6 ऑक्टोबर रोजी प्लांट कमिशनिंग प्रमाणपत्रही या प्रकल्पाला जारी केले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.