MPC Impact :…अखेर देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचा आदेश मागे, हद्दीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशच लागू

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाने अखेर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देणारा आपला आदेश मागे घेतला आहे. यापुढे हद्दीत पंधरा जून सकाळी सात वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांचाच आदेश लागू राहणार असल्याचे सुधारीत आदेशात म्हटले आहे. ‘एमपीसी न्यूज’ने सर्वप्रथम जिल्हाधिकारी व कॅंटोन्मेंट बोर्डाच्या आदेशात भिन्नता असल्याचे समोर आणले होते. त्यानंतर देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाने आपला आदेश मागे घेतला आहे.

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रामस्वरुप हरितवाल यांनी आज (मंगळवारी) सायंकाळी सुधारीत आदेश काढला आहे. या आदेशानुसार देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काढलेले आदेश लागू राहतील. हद्दीत आज, मंगळवारी झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

त्यामुळे उद्या (बुधवारपासून) हद्दीत मेडिकल स्टोअर्स वगळता अन्य अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी सात ते 11 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. तर, अन्य दुकाने पुढील आदेशापर्यंत बंदच ठेवावी लागणार आहेत.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी 15 जूनपर्यंत लागू असणाऱ्या निर्बंधांसाठी सोमवारी आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कॅंटोन्मेंट बोर्ड, सर्व नगरपालिका व ग्रामपंचायतींसाठी हा आदेश लागू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

कॅंटोन्मेंट बोर्डचा देखील जिल्हा नियमावलीत समावेश होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियम कॅंटोन्मेंट बोर्डाला लागू होतात. मात्र, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे सीईओ रामस्वरुप हरितवाल यांनी महापालिका आदेशाचे अनुकरण करत नवी नियमावली जाहीर केली होती. त्यावर सर्वप्रथम ‘एमपीसी न्यूज’ने बातमी करत ही बाब समोर आणली होती. अखेर देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाने आपला आदेश मागे घेतला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.