Mpc News Vigil : मीटरप्रमाणे रिक्षा सुरु करण्यासाठी आरटीओ प्रशासन सकारात्मक – अतुल आदे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मीटरप्रमाणे रिक्षा प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सकारात्मक आहे. रिक्षा चालकांच्या मागण्यांबाबत कोरोना काळात चर्चा न झाल्याने हा विषय बारगळला आहे. लवकरच मीटरप्रमाणे रिक्षा सुरु करण्यासाठी आरटीओ प्रशासन सकारात्मक असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) अतुल आदे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या पाच लाखांहून सुमारे 25 लाख एवढी झाली आहे. शहराची स्मार्ट सिटीच्या यादीत निवड झाली आहे. स्मार्ट सिटीची कामे देखील सुरु झाली असून शहर आता स्मार्ट होत आहे. तरीही शहरात मनमानी पद्धतीने रिक्षा भाडे आकारले जाते. मीटरप्रमाणे रिक्षा भाडे घेण्याची मागणी नागरिक करत आहेत. मात्र, रिक्षांचा मीटर डाऊन झालेला नाही.

आरटीओ अतुल आदे म्हणाले, “शहरात मीटरप्रमाणे रिक्षा चालायला हव्यात. कोरोना पूर्वीच्या काळात रिक्षा चालकांनी भाडेवाढ करण्याची मागणी केली होती. कोरोना काळात तो विषय बारगळला.

भाडेवाढ या विषयावर चर्चा करून मीटरप्रमाणे रिक्षा वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. रिक्षा संघटना, रिजनल ट्रान्सपोर्ट ॲथॉरीटी (आरटीए), आरटीओ, पोलीस यांची बैठक येत्या काही दिवसात होणार आहे. त्याबाबत संबंधितांशी बोलणी करून नियोजन सुरु आहे.”

मीटरप्रमाणे रिक्षा सुरु करण्यासाठी लोकांची मागणी हव्या त्या प्रमाणात येत नाही. मीटरप्रमाणे शहरात रिक्षा धावतात का, यावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यासाठी आरटीओकडून वायव्य पथकाला आदेश दिले आहेत. या पथकाकडून मीटर नुसार रिक्षा धावत नसतील तर त्यावर कारवाई केली जात असल्याचेही आदे यांनी सांगितले.

शहरात मागील काही वर्षांपासून नवीन अधिकृत रिक्षा स्टॅन्ड तयार झाले नाहीत. यावर बोलताना आरटीओ आदे म्हणाले, “अधिकृत रिक्षा स्टॅन्ड तयार करण्याचे अधिकार पोलीस विभागाला आहेत. पोलिसांनी सर्वेक्षण केल्यानंतर तो विषय आरटीएच्या बैठकीत ठेवता येतो. त्यानंतर त्यावर चर्चा होऊन नवीन रिक्षा स्टॅन्डला मंजुरी दिली जाते. महापालिका देखील स्वतःच्या अधिकारात नवीन रिक्षा स्टॅन्ड तयार करू शकते.

शेअर रिक्षामध्ये मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात प्रवासी भरले जातात. त्यावर पोलीस कारवाई करू शकतात. जिथून प्रवासी भरले जातात तिथून कारवाई करणं सोयीचं आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस असतातच, त्यांच्याकडून कारवाई होते. मीटर प्रमाणे रिक्षा सुरु करण्यासाठी सकारात्मक विचार सुरु आहे. रिक्षा संघटना, आरटीओ आणि पोलीस यांच्या माध्यमातून या उपक्रमाची लवकरच सुरुवात केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.