Mumbai News : उदयनराजे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; मराठा आरक्षणासह इतर विषयांवर चर्चा

एमपीसी न्यूज – भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (बुधवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवर दोघांत अर्धा तास चर्चा झाली. यावेळी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात एक निवेदन दिलं.

मराठा आरक्षणाला होत असलेल्या दिरंगाईबाबत मुख्यमंत्र्यांनी यामध्ये स्वत: लक्ष घालावे. मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही वेळकाढूपणा, हलगर्जीपणा करु नये अशा सक्त सूचना राज्य सरकारला देऊन हा विषय मार्गी लावावा, असं आवाहन उदयनराजे यांनी केलं.

मराठा आरक्षणसंबंधी काही मुद्द्यावर श्वेतपत्रिका काढण्यास राज्य सरकारला भाग पाडावे. जेणेकरुन समाजात निर्माण झालेला असंतोष कमी होईल, असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती‌. मराठा आरक्षणात वडीलकीच्या नात्याने त्यांनी लक्ष घालावे, या संबंधीच्या खटल्यामध्ये कोणत्याही प्रकराचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करू नये. त्यासाठी तशा सक्त सुचना राज्य सरकारला देवून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी पवारांकडे केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.