Pimpri : महापालिका आयुक्त सत्ताधारी चांडाळचौकडीचे ‘म्होरके’; शिवसेनेची घणाघाती टीका

सत्ताधा-यांना सफाई कर्मचा-यांचे देणे घेणे नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपची चांडाळचौकडी ठेकेदारांचे भले करण्यासाठी काम करतात. या टोळीचे आयुक्त श्रावण हर्डीकर ‘म्होरक्या’ आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या शिरुर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली. तसेच शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईची निविदा रद्द करण्याबाबत हतबलता दर्शवत आयुक्त हर्डीकर यांनी भाजपची लाचारी दाखविली आहे, असेही त्या म्हणाल्या. सफाई कर्मचा-यांच्या बैठकीकडे सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी पाठ फिरविल्याने त्यांच्यावरही उबाळे यांनी टीकास्त्र सोडले.

यांत्रिकीकरणाला विरोध असल्याने सफाई कर्मचा-यांची बाजू जाणून घेण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) सर्वपक्षीय पदाधिकारी, स्वयंरोजगार संस्थेची बैठक आयोजित केली होती. मात्र, महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेते, स्थायी समितीचे अध्यक्ष महापालिकेत असतानाही त्यांनी या बैठकीला येणे टाळत दांडी मारली.

उबाळे म्हणाल्या,  यांत्रिकीकरणामुळे कंत्राटी पद्धतीने घेतलेले 68 स्वयंरोजगार संस्थेच्या 1800  कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे ही निविदा रद्द करण्यासाठी सफाई कर्मचारी संघटनांची मागणी आहे. परंतु, आयुक्त श्रावण हर्डीकर भाजपच्या दबावाखाली सफाई कर्मचा-यांना दाद देत नाहीत. निविदा रद्द करण्याबाबत हतबलता दर्शवत आहेत.

यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईची निविदा मी रद्द करू शकत नाही. सत्ताधारी पक्षाने हा विषय सर्वसाधारण सभेत मांडायला हवा. मी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जाऊ शकत नाही. तुमचे सरकार आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून यावर स्थगिती आणा, असे बेजबाबदार उत्तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्याचे उबाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.